दुसऱ्यांदा सिझेरियन प्रसूतीसाठी महिलाच आग्रही

Pregnant-Women
Pregnant-Women

मुंबई - खासगी रुग्णालयांतील सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढत असून, दुसरी प्रसूतीही याच पद्धतीने व्हावी, असा आग्रह गर्भवतीच धरत असल्याचे निरीक्षण प्रसूतितज्ज्ञांनी नोंदविले आहे. पहिल्या प्रसूतीदरम्यानच्या असह्य कळा आणि अन्य समस्या, हे यामागील कारण असल्याचे मुंबई गायनोकोलॉजिकल सोसायटीचे माजी अध्यक्ष व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बिपीन पंडित यांनी सांगितले.

पहिल्यांदा सिझेरियन प्रसूती झाली, की दुसऱ्यांदाही त्याच पद्धतीचा अवलंब करावा लागतो, अशी धारणा आता महिलांमध्ये रुजू लागली आहे. त्यामुळे दुसऱ्या गर्भारपणात नावनोंदणीपासूनच महिला सिझेरियन प्रसूतीचा आग्रह धरतात. देशातील सिझेरियन प्रसूतीकडील कल विनाकारण वाढत आहे, असे मत डॉ. पंडित यांनी व्यक्त केले. प्रसूतीत काही समस्या उद्‌भवल्यास सिझेरियन पद्धत सुचविली जाते. त्याबाबत अंतिम निर्णय गर्भवती व तिच्या पतीचा असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहिली प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली असली, तरी दुसरी प्रसूती नैसर्गिक होण्याची ६० टक्के शक्‍यता असते. त्यामुळे गर्भवतींनी सिझेरियन प्रसूतीचा आग्रह धरू नये, असा सल्ला डॉ. पंडित यांनी दिला. महिलांमध्ये प्रसूतीबाबत अनेक गैरसमज आहेत, असे जे. जे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले. गर्भवती महिलेला मधुमेह, अस्थमा आदी आजार असल्यास प्रसूतीच्या वेळी अडचणी येऊ शकतात. मात्र, त्यासाठी सिझेरियन पद्धतीचा अवलंब करायला हवा असे नाही. समस्या वाढल्यास मात्र सिझेरियन प्रसूती करावी लागते, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com