"मिरज वैद्यकीय'मध्ये रुकडीतील कुलकर्णी दांपत्यांच्या स्मृती 

"मिरज वैद्यकीय'मध्ये रुकडीतील कुलकर्णी दांपत्यांच्या स्मृती 

मिरज - रुग्णसेवेसाठी सेवावृत्तीने आयुष्य व्यतीत केलेल्या रुकडी (जि. कोल्हापूर) येथील डॉ. उद्धव आणि डॉ. प्रज्ञा कुलकर्णी या दांपत्याचा निर्घुण खून झाला. या घटनेला येत्या 7 ऑगस्टला तीन वर्षे पुर्ण होतील. या सेवाभावी दाम्पत्यांच्या स्मृती सभागृहाच्या रुपाने कायम ठेवण्याचे सत्कार्य त्यांच्या नातलगांनी केले आहे. 

कुलकर्णी दाम्पत्यांची ओळख मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली. तिथून त्यांनी रुग्णसेवेचा वसा घेतला आणि आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी उभारी घेतली. त्याच महाविद्यालयाच्या आवारात त्यांच्या कार्याचे, स्मृतीचे जतन व्हावे असा विचार त्यांच्या मृत्यूनंतर उध्दव कुलकर्णी यांचे भाऊ चंद्रकांत व भालचंद्र यांनी केला आणि तडीस नेला. 

या डॉक्‍टर दांम्पत्याने लग्नानंतर रुकडी येथे स्थायिक होत रुग्णसेवा सुरु केली. गरीबांचे डॉक्‍टर म्हणून नाव मिळवले. त्यांचे अश्विनी क्‍लिनीक सर्वांसाठी खुले असायचे. 2016 च्या ऑगस्टमध्ये या दापंत्याचा खून झाला. त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचे वारस ठरलेल्या भाऊ व इतरांनी एकत्र येत या दाम्पत्यांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य विनियोग व्हावा, असा विचार केला. त्यासाठी ते मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आले.

अधिष्ठातांनी महाविद्यालयाला सुसज्ज सभागृहाची गरज असल्याचे सांगितले. सध्याचे सभागृह महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचे होते. मग सहा हजार चौरस फुट जागेत सहा महिन्यांतच सुसज्ज सभागृहाचे नियोजन झाले. त्यामध्ये आसनव्यवस्था, दोन गेस्टरुम, पाहुणे व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली. गेल्या आठवड्यात कोणताही गाजावाजा न करता एका छोटेखानी कार्यक्रमात या सभागृहाचे हस्तांतरण झाले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. विजयकुमार बोराडे, योगेश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, उपेंद्र कुलकर्णी, श्रद्धा वाळींबे, माधुरी कुलकर्णी, हर्षदा कुलकर्णी, विजय जमदग्नी, अनिल कुलकर्णी, संजय वाळिंबे, वास्तुविशारद सोमाणी, मगदुम आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com