राहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला

rahuri
rahuri

राहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात ही घटना घडली.

या घटनेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश झाला आहे. 'सूर्यास्त ते सूर्योदय' गौण खनिज उत्खनन व वाहतूक बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला राहुरी तालुक्यात केराची टोपली दाखविली जाते. हे समोर आले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या टेम्पोच्या जवळ आगपेटी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे, टेम्पो जाणीवपूर्वक पेटवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

मुळा धरणाचा जलसाठा कमी झाल्याने, धरणाच्या जलफुगवटा भागात दरडगाव थडी (मायराणी) व चिखलठाण येथे मुळा नदी पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. या ठिकाणी शेकडो मजूर वाळू उत्खनन व वाहने भरण्यासाठी नदीपात्रात काम करतात. टेम्पो, ट्रॅक्टर व मालट्रकद्वारे वाळू वाहतूक केली जाते. येथील वाळूची वाहने तहाराबाद घाटातून राहुरी तालुक्यात, आंग्रेवाडी-तास पुलावरून पारनेर तालुक्यात आणि खांबा-वरवंडी मार्गे संगमनेर तालुक्यात दिवस-रात्र धावत आहेत. भरधाव वाळूच्या वाहनांमुळे अनेकदा अपघात घडत आहेत.

चिखलठाण येथे वनखात्याच्या हद्दीत वाळू साठे तयार केले आहेत. महसूल, वन व पोलीस या तीनही खात्यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने या दुर्गम भागात अवैध वाळूधंदा फोफावला आहे.

"वाहनाच्या वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने, तहाराबाद घाटात वाळूचे वाहन जळाले असावे. चोरटी वाळू वाहतूक रोखण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे. त्यांनी पोलिस संरक्षण मागितल्यावर दिले जाते. कुठेही वाळूचे लिलाव नाहीत. जळालेल्या वाहनात वाळू होती. -  हनुमंत गाडे, पोलीस निरीक्षक, राहुरी."

"घटनेची अद्याप माहिती समजली नाही. अवैध वाळू रोखण्यासाठी महसूलची पथके फिरतात. चोरुन वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जळीत वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल केला जाईल. - अनिल दोंडे, तहसीलदार राहुरी."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com