उदयनराजेंनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले : शिवेंद्रसिंहराजे

shivendra-raje
shivendra-raje

सातारा : स्वत: महसूलमंत्री असताना सातारा जिल्ह्यातील गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्‍के मारले. हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार कोणी केला? या हजारो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची थापेबाजी करणारा जनतेचा कैवारी कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, अशी गत खासदार उदयनराजे भोसले यांची झाली आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

माझी दाढी आणि विसर्जन याचा काही संबंध आहे का? पण, विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही दाढीकडे गेलात. माझ्या दाढीची काळजी तुम्ही करू नका. मला दाढी आहे म्हणून दाढी येते. तुम्हाला उगवती का नाही आणि उगवली तर, राहील का नाही, अशी चिंताजनक अवस्था तुमची आहे. तुमच्या लहरीपणामुळे विसर्जनाची काय परिस्थिती झाली? ज्या मंगळवार तळ्यात विसर्जन होत होते ते तुम्ही मायलेकराने बंद पाडले आणि आता त्याच तळ्यात विसर्जन करण्याचा अट्टाहास करून हम करे सो कायदा, करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी कोणीतरी वेगळा आहे, हे दाखवण्याचा तुमचा स्टंट तुमच्याच अंगलट आला आहे.

तुमची थापेबाजी, भंपकगिरी आणि ड्रामेबाजी आता लोकांना कळून चुकली आहे. हळूहळू तुमचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे आणि हे जास्त दिवस चालणार नाही, असा टोलाही आमदार भोसले यांनी लगावला आहे. आमदार भोसले पत्रकात म्हणतात, ज्या सातारकरांसमोर तुम्ही आणि मी दोघेही लहानाचे मोठे झालो, ज्या सातारकरांनी दोघांनाही घडवले, त्यांच्यासमोर माफी मागण्यात कमीपणा वाटण्याचे कारणच काय? अजिंक्‍यतारा बॅंक अडचणीत आली पण, बॅंक विलीनीकरण करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत दिले. बॅंक अडचणीत आल्याबद्दल मी पालिका निवडणुकीच्या जाहीर सभेत गांधी मैदानावर सातारकरांची माफी मागितली आहे. यात मला कमीपणा वाटला नाही. आज तुम्ही सातारकरांना वेठीस धरून विसर्जनाची तेढ निर्माण केली.

गणेश मंडळांमध्ये संभ्रम निर्माण करून हा प्रश्‍न सोडवण्याऐवजी चिघळवला. आता प्रशासनाने कृत्रिम तळे खोदले तर, माझ्यामुळेच खोदले असे निर्लज्जपणे सांगता. याबद्दल थोडीतरी शरम बाळगा आणि सातारकरांची माफी मागा. माफी मागण्यात तुम्हाला कमीपणा वाटण्याचे कारण काय, असा प्रश्‍नही उदयनराजेंना केला आहे. मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, या अट्टाहासापोटी खासदारांनी साताऱ्यातील गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न चिघळवला. काहीही झाले तरी मंगळवार तळ्यात विसर्जन करणारच, अशी आडमुठी आणि अडेलतट्टू भूमिका घेणारे खासदार आता माझ्यामुळेच प्रशासनाने कृत्रिम तळे खोदल्याचे सांगत आहेत. मंगळवार तळे का कृत्रिम तळे? नेमकी तुमची भूमिका काय होती, हे एकदा स्पष्ट करा. ज्या पालिकेत एकहाती सत्ता आहे, त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून त्या आदेशाप्रमाणे मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास पालिकेनेही बंदी केली आहे. जास्त फुशारक्‍या मारू नका, कारण सातारा पालिकेनेच तुमचे नाक कापले आहे, असा टोलाही लगावण्यात आला आहे. 

तुम्हाला साधी एक पतसंस्था काढायची अक्‍कल नाही, अशांनी आमच्या संस्थांबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे बोट दाखवण्यासारखे आहे. स्वत: महसूलमंत्री असताना सातारा जिल्ह्यातील गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्‍के मारले. हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार कोणी केला? या हजारो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची थापेबाजी करणारा जनतेचा कैवारी कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. हे म्हणजे स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, अशी गत तुमची झाली आहे, असेही आमदार भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com