ओझर्डेच्या मसाल्यांची फोडणी झणझणीत

Tanishka-Women
Tanishka-Women

सातारा - स्वयंपाक चमचमीत व्हावा, पदार्थांना फोडणी झणझणीत बसावी, यासाठी ओझर्डे (ता. वाई) येथील तनिष्का गटातील महिलांनी दर्जेदार मसाले तयार केले आहेत. या उद्योगातून महिलांची स्वावलंबाकडे वाटचाल सुरू आहे.

सगळ्याजणी चांगल्या आर्थिक परिस्थितीतील होत्या; पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात होती. इंटरनेटवरील माहितीमुळे तनिष्कांनी मसाले तयार करण्याचा व्यवसाय सुरू करत केला. याबरोबरीने गावातील विकासकामातही तनिष्कांनी पुढाकार घेतला आहे. मसाले करण्यासाठी सुरवातीला घरातूनच भांडवल उभे केले. तयार झालेले मसाले ओळखीचे लोक, पै पाहुण्यांना दिले. संक्रांतीला वाण म्हणूनही गावात वाटले. या मसाल्यांना गावातील महिलांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तनिष्कांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर गावच्या यात्रेत छोट्या- छोट्या पुड्या तयार करून विक्रीसाठी काही दुकानातही ठेवल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

मसाल्याची चव आवडल्याचे अनेकांनी आवर्जून तनिष्कांना सांगितले. ही पोचपावती मिळाल्यानंतर तनिष्कांनी व्यवसाय वाढविण्यासाठी संस्कृती महिला बचत गटाची स्थापना करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतले. नवीन वजनकाटा, मिक्‍सरसारखे लागणारे साहित्य घेतले.

पुण्यातून कच्चा माल आणला. सुरवातीला मटण, चिकन, बिर्याणी, पावभाजी असे मसाले तयार केले. नवनवीन मसाले त्या इंटरनेटवर, यू ट्यूबवर बघतात. तसे करून बघतात. कोकणी, मिसळ, सांबर, चाट मसाला, दूध मसाला, गोडा मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, कढई मसाला असे विविध मसाले आकर्षक पॅकिंगमध्ये बनवू लागले आहेत.

कच्चा माल आणण्यासापासून माल निवडणे, धने भाजणे, मिरची व धने दळूण आणणे अशी सर्व कामे तनिष्का स्वतः करतात. गटप्रमुख सुनंदा फरांदे, उमाताई निकम, मीना फरांदे, अंजली सुतार, गौरी पिसाळ, निरुपमा पिसाळ, सुनंदा अण्णासाहेब फरांदे, सुरेखा पिसाळ या तनिष्कांनी व्यवसाय कौशल्यही आत्मसात केले आहे. नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंतीदिनी व साताऱ्यात मानिनी जत्रा, वाई व लोणंदला कृषी प्रदर्शनात स्टॉल उभारून या तनिष्कांनी आपले मसाले विकले आहेत. व्यवसायातून या तनिष्कांनी दोन लाखांची उलाढाल केली असून, बॅंकेचे कर्ज फेडून सध्या ५० हजार रुपयांची ठेवपावती केली आहे. महिलांच्या श्रमातून तयार होणारे हे मसाले लोकांच्या पसंतीस उतरले असून, मसाल्याच्या या यशाचा सुगंध सर्वत्र दरवळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com