राजीव गांधी प्राणिसंग्रहालयास दिली 62,172 पर्यटकांनी भेट 

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयास दिली 62,172 पर्यटकांनी भेट 

पुणे : बागांमध्ये फिरायचे. कुटुंबीयांसमवेत भोजन करायचे. लहानग्यांसोबत खेळायचे आणि त्यांना वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल दाखवायचे! याचसाठी दिवाळी पर्यटनाला नागरिक घराबाहेर पडत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीची सुटी लागल्यापासूनच देश-विदेशातील पर्यटक बहुसंख्येने येत आहेत. शनिवारी तर वीस हजारांच्या आसपास पर्यटकांनी भेट दिली. शहरातील उद्यानेही पर्यटकांनी बहरली आहेत. 

कुटुंब, मित्र परिवार, नातेवाइकांसमवेत दिवाळीचा सण साजरा करायचा म्हणून राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून तसेच वेगवेगळ्या राज्यांतून, परदेशातून नागरिक पुण्यनगरीत दाखल झाले आहेत. अनेकांनी नातेवाईक, मित्र परिवासोबत दिवाळीचा आनंद घ्यायचा म्हणून आठवडाभराची रजा काढली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नागरिकांनी पर्यटनाचे नियोजन केले आहे. दिवाळीतल्या प्रत्येक दिवशी पर्यटकांच्या उपस्थितीने शहर व उपनगरांतील बागा फुलल्या आहेत. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला तर एक ते दहा नोव्हेंबरपर्यंत 62,172 पर्यटकांनी भेट दिली आहे. सकाळी साडेनऊपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पर्यटकांनीच गजबजून जात आहे. 

सारसबाग, पु. ल. देशपांडे उद्यान, संभाजी बाग यासह अन्य बागांमध्ये जाऊन खेळण्याचा आनंद बच्चेकंपनी घेत आहे. मात्र बच्चेकंपनीला वेगवेगळे प्राणी दाखविण्यासाठी नागरिकही आवर्जून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात भेट देत आहेत. प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक डॉ. एन. के. निघोत म्हणाले, ""प्राणिसंग्रहालयात 67 प्रजातींचे 423 प्राणी आहेत. दिवाळीनिमित्त दररोज पर्यटक उत्स्फूर्तपणे प्राणिसंग्रहालयास आनंदाने भेट देत आहेत. 130 एकराचा परिसर असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने चाळीस सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. सुटीच्या मूडमध्ये पर्यटकही आनंदाने प्राणिसंग्रहालयास भेट देऊन वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती घेत आहेत.'' 

मी सोलापूरहून दिवाळीनिमित्त पुण्यात आले आहे. माझ्या मुलांसह मी प्राणिसंग्रहालयास भेट दिली. येथील वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी मुलांना दाखविले. त्यांनाही प्राणी पाहत सुटीचा आनंद घ्यायला मिळाला. दिवाळीच्या सुटीनिमित्त वेगवेगळ्या बागा व प्राणिसंग्रहालयांस भेट द्यायला पाहिजे. त्यामुळे मुलांनाही आनंद मिळेल. 
अंजली देशपांडे, पर्यटक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com