मनापासून प्रयत्न आणि जिद्द हवी

MPSC
MPSC

पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेत अव्वल आलेल्यांनी दिला. या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या काही उमेदवारांची संवाद साधला असता त्याच्या यशाचे गमक उलगडत गेले.

नियोजनबद्ध अभ्यासामुळेच यश
‘‘केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अपयश आले. परंतु, खचून न जाता ‘एमपीएससी’ची तयारी केली. यूपीएससीमुळे पाया भक्कम झाल्यामुळे २०१७ मध्ये मुख्य अधिकारीपद मिळविले. परंतु, समांतर आरक्षणामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यानंतर पुन्हा प्रयत्न केला आणि आता परीक्षेत राज्यात पहिला आल्याचा आनंद होत आहे,’’ या शब्दांत आशिष बारकुल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘दररोज आठ ते दहा तास नियमित अभ्यास करायचो. अभ्यासाचे योग्य नियोजनही तितकेच महत्त्वाचे असते,’’ असेही आशिष यांनी सांगितले. 

स्वप्न साकार
मावळ तालुक्‍यातील तळेगावमधील माळवाडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वाती दाभाडे या एमपीएससीत मुलींमध्ये पहिल्या आल्या आहेत. स्वाती यांचे आई-वडील भाजीपाला पिकवून त्यांची विक्री करतात. स्वाती यांचे बारावीनंतर शिक्षण थांबविले होते. परंतु, शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना! म्हणून त्यांनी घरगुती शिकवणी वर्ग सुरू केले. त्यातून पैसे साठल्यावर त्यांनी चार वर्षांच्या ‘गॅप’ नंतर पुन्हा शिक्षणास सुरवात केली.

तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळविली. ‘‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास सुरवात केली त्या वेळी फारसे माहीत नसल्यामुळे पहिल्या वर्षी अपयश आले. मात्र, त्यानंतर एकाच वर्षात विविध परीक्षा देऊन चार पदे मिळवली. परंतु, ‘उपजिल्हाधिकारी’च व्हायचे ठरविल्याने २०१८ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि मुलींमध्ये राज्यात पहिली आले,’’ असे त्यांनी सांगितले.

आज बाबा हवे होते...
सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर आपला मुलगा असावा, असे आई-वडिलांचे स्वप्न होते. आज त्या दोघांचे स्वप्न मी पूर्ण केले. परंतु, ते पाहायला आज बाबा नाहीत, या शब्दांत दर्शन निकाळजे यांनी भावना व्यक्त केल्या. सिंहगड इन्स्टिट्यूटमधून २०१६मध्ये मेकॅनिकलमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेत त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. परंतु, त्याहून मोठे पद मिळवायचे, या ध्येयापोटी त्यांनी सुटी घेऊन यश मिळवले. आता त्यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार आहे. दररोज १० ते १२ तास नियमित अभ्यास केला. परीक्षेपूर्वी काही महिने वेळापत्रक करून त्याप्रमाणे काटेकोरपणे अभ्यास केला,’’ असे दर्शन यांनी सांगितले. 

सासरच्यांची साथ मोलाची
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील प्रियांका पाटील आता लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. एमपीएससीच्या परीक्षेत महिलांमध्ये प्रियांका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भुसावळमधील नवोदय विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. प्रियांका यांचे ‘डॉक्‍टर’ बनण्याचे स्वप्न होते. मात्र, बीडीएस झाल्यावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दरम्यान, त्यांचे लग्न झाले. सासरच्या मंडळींकडूनही अभ्यासासाठी चांगली साथ मिळाली. उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार असल्याचा आनंद आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com