पुण्यातील तरुण नक्षलवादी म्होरक्या    

पुण्यातील तरुण नक्षलवादी म्होरक्या    

पुणे - मुंबईमध्ये चित्रकला प्रदर्शनाचे काम मिळाल्याचे सांगून कासेवाडीतून नऊ वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला संतोष शेलार हा तरुण सध्या छत्तीसगडमध्ये प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या एका विभागाचा डेप्युटी कमांडर झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा तरुण सुरवातीस कबीर कला मंचच्या संपर्कात होता. दरम्यान, पुण्यातील आणखी एक तरुण नक्षलवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सूत्रांनी दिली. 

एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांकडून कथित नक्षलवादी संघटनांशी संबंधी अनेक बुद्धिवंतांना ताब्यात घेतले. हे प्रकरण न्यायालयात असतानाच छत्तीसगढ पोलिसांनी रांजनांदगावमधील नक्षलवादी कारवायांबाबतची एक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये चौदा नावांचा समावेश असून, त्यामध्ये ‘विश्‍वा, वय २८, राहणार पुणे, महाराष्ट्र’ या नावाचाही उल्लेख आहे. 

शरण नक्षलवाद्यांकडून माहिती
कासेवाडीतील संतोष हा २०१० मध्ये बेपत्ता झाल्यानंतर गडचिरोलीतून छत्तीसगडमध्ये पोचला. तेथील नक्षलवादी संघटनेच्या रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा विभाग समितीचा सध्या तो डेप्युटी कमांडर असल्याचे छत्तीसगढ पोलिसांनी स्पष्ट केले असून, त्यास पुणे पोलिसांनीही दुजोरा दिला. महाराष्ट्र पोलिसांनी ६० नक्षलवाद्यांना गडचिरोलीमध्ये ठार केले होते. त्या वेळी तेथे काही पुस्तके, वह्या, चित्रांच्या वह्या आढळल्या होत्या. त्यापैकी एका वहीमध्ये विश्‍वा नावाची स्वाक्षरी होती. चित्रकलेच्या वहीमध्ये त्यानेच चित्र काढल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गडचिरोली पोलिसांना शरण आलेल्या काही नक्षलवाद्यांच्या चौकशीमध्ये संतोष शेलार हाच ‘विश्‍वा’ असल्याचे उघड झाले. 

शंभर रुपये घेऊन सोडले घर
संतोष सात नोव्हेंबर २०१० रोजी घरातून सकाळी निघून गेला. त्याने नववीपयर्यंत शिक्षण घेतले होते, त्याला चित्रकलेची आवड होती. काही वस्तू, पुस्तके, कपडे व शंभर रुपये बरोबर घेऊन, ‘मला मुंबईमध्ये दोन वर्षांसाठी चित्रकलेचे काम मिळाले आहे,’ असे आईला सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नाही. अखेर त्याच्या कुटुंबीयांनी १० जानेवारी २०११ रोजी खडक पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.  

कबीर कला मंचशी संपर्क
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) २०११ मध्ये प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या अँजेला सोनटक्के हिच्यासह कबीर कला मंचच्या १४ जणांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये संतोष शेलार व प्रशांत कांबळे या दोघांचा समावेश होता. संतोष कासेवाडी झोपडपट्टीत, तर प्रशांत हा ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये राहत होता. दोघांचाही कबीर कला मंचशी संपर्क होता. संतोष प्रमाणेच प्रशांतही २०१० मध्ये पुण्यातून बेपत्ता झाला होता. प्रशांत हा देखील नक्षलवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

संतोष शेलार बेपत्ता झाल्यानंतर तो गडचिरोलीतून छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला. याबाबत पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्या वेळी संतोष हा कबीर कला मंचच्या संपर्कात होता, हेदेखील कागदोपत्री नमूद आहे.
-  डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com