‘अर्थ डे’चा अर्थ

dr anil lachke
dr anil lachke

पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.  

नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी परस्परावलंबी असतात. ‘इन नेचर नथिंग एक्‍झिट अलोन’ असं रेचेल कार्सन या निसर्गप्रेमी महिलेने म्हटलं होतं. हवा, पाणी, माती, वृक्ष, पशू, पक्षी, प्राणी आणि आपण परस्परावलंबी साखळ्यांमध्ये गुंतलेलो आहोत. त्यामुळे आपल्याकडे ‘जीवो जीवस्य जीवनम्‌’, असं म्हणतात. पसायदानात संत ज्ञानेश्‍वरांनी ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ असं म्हटलंय. चराचर सृष्टीमध्ये जैविक-अजैविक अशा सर्वच घटकांमध्ये ‘मैत्री’ असो! पण मानवाच्या बहुतेक हालचाली निसर्गाला बाधक असतात. जिथं नैसर्गिकता संपते, तिथं प्रदूषण जन्माला येतं. ते निसर्गाच्या तोलचक्राला हेलकावा देतं. परिणामी वसुंधरेवरील पर्यावरणाला आणि वैविध्यतेला धक्का बसतो. विश्‍वाच्या प्रांगणात ज्ञात असलेली ही एकमेव वसुंधरा आहे. ती आपल्याकडे वंशपरंपरेने चालून आलेली नाही. आपण ती भावी पिढ्यांकडून उसनी मिळवलीय. तेव्हा वसुंधरेचे सौंदर्य जपणं आपलं कर्तव्यच ठरतं.

महासागरात खनिज तेलगळतीमुळे सागरी जीवसृष्टी धोक्‍यात येते. जंगलतोड, हवामान बदल, प्रदूषण, नामशेष होणाऱ्या वनस्पतींच्या जाती-प्रजाती पाहून अमेरिकेचे सिनेटर नेल्सन बेचैन झाले. लोकजागृती केली तर पर्यावरणाचा ऱ्हास कमी करता येईल आणि पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकवता येईल, असं त्यांना वाटलं. त्यांनी २२ एप्रिल १९७० रोजी ‘अर्थ डे’ साजरा करण्यासाठी लोकांना आवाहन केलं. त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वर्षी अमेरिकेत पन्नासावा ‘पृथ्वी दिन’ साजरा होतोय. याला आपण ‘वसुंधरा दिन’ म्हणतो. पर्यावरणविषयक (सर्वतोपरी) जागृती हा त्याचा उद्देश. पर्यावरण संरक्षणासाठी विज्ञान-तंत्रज्ञान उपयुक्त ठरलंय. प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण वाढल्यामुळे गेल्या वर्षी एकदाच वापरून बाद होणारी प्लॅस्टिकची उत्पादने बंद व्हावीत म्हणून प्रयत्न झाले. चमचे, ग्लास, पेय पिण्याचा स्ट्रॉ, थर्मोकोल यांचं उत्पादन आणि वापर कमी झाला. लोक सुती पिशव्या वापरू लागले. आता पॉलिएथिलिन टेरेथॅलेटसारख्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होतोय. संशोधकही पॉलिकॅप्रोलॅक्‍टम्‌, पॉलिब्युटिलिन सक्‍सीनेट असे लवकर विघटनशील होणारे प्लॅस्टिक-पॉलिमर तयार करण्यासाठी संशोधन करत असतात.

पृथ्वीवर १९ लाख प्राण्यांचे प्रकार आहेत. वनस्पतींचे प्रकार साडेचार लाख आहेत. प्राण्यांचे २०० ते २००० प्रकार प्रतिवर्षी नामशेष होत आहेत. सूक्ष्मजीव, वनस्पती, कीटक, पक्षी आणि प्राणी यांमधील १०० ते १५० प्रकार प्रतिदिन नष्ट होत आहेत. प्रजातींचं नष्टचर्य नैसर्गिक नाही, तर पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होतंय. सुदैवाने नवी दिल्लीमधील ‘एनबीपीजीआर’ संस्थेने वनस्पतींचे चार लाख वाण शास्त्रशुद्ध पद्धतीनं जतन केले आहेत. ही जगातील सर्वात मोठी वनस्पतींची (जीन) बॅंक आहे.
निसर्गाच्या प्रयोगशाळेत तल्लीन होणारे संत तुकाराम महाराज म्हणत, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’. निसर्गातील सर्वच घटकांना त्यांनी नातेवाइकांचा दर्जा दिला. कारण त्यांना जीवसृष्टीतील परस्परावलंबित्व ध्यानात आलं होतं. या जैवविविधतेचा सांभाळ करणं (प्रोटेक्‍ट अवर स्पिसीज) हा या वर्षीच्या ‘अर्थ डे’चा कार्यक्रम आहे. इंग्रजीत याकरिता तीन ‘आर’चा वापर करायचं सुचवलंय - ‘रिड्यूस्‌, रियूज्‌, रिसायकल.’ साधनसामग्रीचा काटकसरीनं (वारंवार) वापर करायचा आणि वापरलेल्या साधनांचा पुनर्वापर करायचा. यात रिप्लेनिश आणि रिस्टोअर अशा दोन ‘आर’ची भर पडलेली आहे. ‘रिसायकल’ करण्यासाठी अनेक उत्पादनं आहेत. मोटारीचा कॅटॅलिटिक कान्हर्टर, काचा, धातूंचे पत्रे, टायर, पॉलिमर आदी गोष्टींचा पुनर्वापर करता येतो. सेलफोनच्या जडणघडणीत ७५ मूलद्रव्यांचा वापर केला आहे. कॉम्प्युटर, सेलफोन, टीव्ही अशा विविध इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमधील मूलद्रव्यांचा पुनर्वापर व्हायला पाहिजे.      

पेट्रोकेमिकल्सचा किमान वापर करायचा. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्‍साईडचं प्रमाण वाढणार नाही. छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर केला तर धुराचं आणि आवाजाचं प्रदूषण टाळता येईल. भारतात पवनऊर्जेचं प्रमाण एकूण ऊर्जानिर्मितीच्या तीन टक्के आहे. सौरनिर्मितीच्या क्षेत्रातही भारत जगात अग्रगण्य आहे. पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे भारत ‘वसुंधरा दिना’ला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त करून देत आहे!   एक वृक्ष प्रतिवर्षी २२ किलोग्रॅम कार्बनडायऑक्‍साईड शोषून घेतो आणि वर्षभरात चार व्यक्तींना पुरेल एवढा ऑक्‍सिजन हवेत सोडतो. तसेच वातावरणातील १.७ किलोग्रॅम प्रदूषण करणारी अपायकारक रसायनं शोषून घेतो. पक्षी, मधमाशीसारखे कीटक, रातकिडे, वटवाघळे, अनेक जीवाणू, बुरशी, शैवाल, माकडांसारखे प्राणी बहुतांशी झाडांवर अवलंबून असतात. ‘देवरायां’सारखी परंपरा आपल्याकडे प्रदीर्घकाळापासून आहे. ‘अर्थ डे’चा अर्थ आपण आधीपासूनच अंगीकारला आहे, ही अभिमानाची बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com