स्पायडरमॅन आता वास्तवातही

samrat kadam
samrat kadam

घरात अडगळीच्या ठिकाणी असलेले कोळ्याचे जाळे आपण सर्वांनी पहिले असेलच. अर्थात, ते अस्वच्छतेचे प्रतीक असल्यामुळे आपण केरसुणीने ते जाळे काढण्याचा प्रयत्नही केला असेल. पण हे जाळे काढताना केरसुणीला घट्ट चिकटलेले आपल्याला दिसते. असे का बरे होत असेल? अत्यंत छोटे असलेले हे तंतू नाकतोडा, माशी, पतंग अशा मोठ्या भक्ष्यांना कसे जखडून धरतात? या धाग्यांमध्ये असा कोणता डिंक आहे? या डिंकाच्या वापराने ‘स्पायडरमॅन’सारखे भिंतीवर चिकटणे शक्‍य होईल का? याचा शोध संशोधक अनेक वर्षांपासून घेत होते. अखेर हा चिकटणारा डिंक प्रयोगशाळेत तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. मेरिलँड विद्यापीठातील सारा स्टेलवॅगन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे यश मिळविले आहे.

सध्या पृथ्वीवर साधारणतः ४५ हजार कोळ्यांच्या प्रजाती आढळतात. त्या प्रत्येक प्रजातीच्या किड्याकडे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असलेला धागा असतो! आणि हा धागा पोलादाइतकाच मजबूत आणि ताकदवान असतो! कोळ्यांनी विणलेल्या या जाळ्यांच्या धाग्यांमध्ये एक चिकट द्रव आढळतो. त्यामुळे किडे, पतंग, माशी यांसारख्या भक्ष्याला जाळ्याशी घट्ट चिकटवून ठेवले जाते. कितीही काळ लोटला तरीही या डिंकाचा चिकटपणा कमी होत नाही. या डिंकाला ‘कोळ्याचा डिंक’ असे म्हटले जाते. हा डिंक खुल्या हवेत, कोणत्याही तापमानाला, प्रत्येक ऋतूत त्याचा चिकटपणा टिकवून ठेवतो. तसेच या डिंकाचा पुन्हा पुन्हा वापर जरी झाला, तरी त्याचे गुणधर्म तसेच राहतात. यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे माणसाच्या दैनंदिन आणि वैद्यकीय उपयोगासाठी त्याचे मोठ्या प्रमाणावर कृत्रिम उत्पादन करण्याचा विचार संशोधक करत आहेत.

या धाग्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता त्यामध्ये डिंकाचा छोट्या गोलाकार थेंबांचा धागा दिसतो. या संपूर्ण धाग्यावर विशिष्ट अंतराने एकसमान दिसणाऱ्या थेंबांची एक स्वतंत्र मालिकाच असते. यामुळेच जाळ्यामध्ये सापडलेले मोठे भक्ष्य तेथून निसटणे अवघड होते. डिंकाची घनता, त्याच्या थेंबाचा आकार हे त्या परिसरातील वातावरणावर अवलंबून असते. त्याच प्रमाणे त्या कोळ्याच्या किड्याचे भक्ष्य काय आहे यावर सुद्धा अवलंबून असते.

कोळ्याच्या डिंकाची गुणसूत्रीय रचना
पदार्थाच्या संपूर्ण अध्ययनासाठी आणि त्याच्या कृत्रिम निर्मितीसाठी त्याची गुणसूत्रीय रचना माहीत असणे आवश्‍यक असते. परंतु या डिंकाची गुणसूत्रीय रचना अत्यंत जटिल आहे. त्याच्या रचनेत गुणसूत्रांची एकाच ठिकाणी पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे त्याच्या संकेतांचे विश्‍लेषण करता येत नाही. समजा एखाद्या प्राण्याच्या ‘डीएनए’मध्ये गुणसूत्रांची रचना ‘तबलावादनात राजेशने प्रावीण्य मिळविले आहे’ अशी असेल. तर संकेतांचे तुकडे केले असता ते असे दिसतील ‘तबलावा’, ‘दनातरा’, ‘जेशनेप्रावि’. या सर्व तुकड्यांची जोडणी केल्यावर गुणसूत्रांची संपूर्ण मालिका बांधणे शक्‍य होते. परंतु कोळ्याच्या डिंकामध्ये हीच रचना जटिल पद्धतीची आहे. उदा. ती रचना ‘तबला वादनात वादनात वादनात वादनात राजेशने प्रावीण्य मिळविले आहे'' या प्रकारची असते. तेव्हा याचे सांकेतिक तुकडे ‘तबलावा’, ‘दनातवा’, ‘दनातवाद’, ‘नातवाद’ अशा प्रकारचे बनतात. जेव्हा यांची जोडणी करून संपूर्ण मालिका बनवायचा प्रयत्न केला जातो. तेव्हा पुनरावृत्ती झालेल्या संकेतांमुळे त्यांची जागा निश्‍चित करणे शक्‍य होत नाही. पर्यायाने त्याची कृत्रिम साखळी बनविणे शक्‍य होत नाही.

 बऱ्याच वर्षांपर्यंत गुणसूत्रीय रचनांच्या जोडणीसाठी अशी पद्धत वापरली जात होती. की ज्यात गुणसूत्रांना तुकड्यात विभागून त्यांची रचना करण्यात येत होती. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नव्या पद्धतीने मोठ्या आकाराची आणि पुनरावृत्ती असलेल्या गुणसूत्रांचे विश्‍लेषण करणे शक्‍य झाले आहे. या पद्धतीत पुनरावृत्ती होणाऱ्या गुणसूत्रांच्या तुकड्यांची जोडणी एकाच वेळेस सुरवातीपासून शेवटापर्यंत करून घेतली जाते. त्यामुळे त्यांच्या जागेतील बदलाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. सुदैवाने हे आधुनिक तंत्रज्ञानाने शक्‍य झाले आहे. परंतु अजूनही हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे.
संशोधकांना प्रयोगशाळेत अशा प्रकारची गुणसूत्रे बनविण्यात यश आले आहे. आता याच गुणसूत्रांचे रोपण ‘जिवाणू’ किंवा ‘बुरशी’मध्ये केले जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर या डिंकाचे उत्पादन करणे शक्‍य होईल. परंतु कोळ्याच्या किड्याप्रमाणे द्रव अवस्थेतील डिंकाचे रूपांतर स्थायू पदार्थातील धाग्यांमध्ये करणे संशोधकांसमोरील मोठे आव्हान आहे. या डिंकाच्या वापरातून घनकचरा कुजवणे, एखाद्या पदार्थाचे विघटन करणे आणि एखादी वस्तू शेकडो वर्षांसाठी चिकटवून ठेवणे शक्‍य होणार आहे. आणि यात सुधारणा झाल्या तर ‘स्पायडरमॅन’सारखे भिंतीवर सहज चढत जाणे शक्‍य होईल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com