आली घटिका समीप..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रि य सौभाग्यवती कमळाबाई ईस अनेकाअनेक इष्ट नमस्कार. माझे पत्र आल्याने तुजला आश्‍चर्य वाटले असेल. स्वत:स अनेकानेक चिमटे काढून पाहिले असशील! आम्हीही (पत्र लिहीत असताना) स्वत:स इतके चिमटे काढून पाहिले आहेत की हे पत्र लिहून पुरे होईतोवर आमच्या सर्वांगावर लालेलाल वळांची नक्षी उमटलेली असेल, असे वाटते. तरी बरे पत्र लिहीत असताना आम्ही खोलीचे दार लावोन घेतले होते. आमच्या हरेक चिमट्यागणिक उमटणाऱ्या किंकाळ्यांनी महाल दुमदुमून दाराशी पहारेकऱ्यांची गर्दी गोळा जाहाली! शेवटी आमचे कदीम फर्जंद तांतडीने दार ठोठावून आंत आले आणि आम्हांस विचारते जाहाले की ‘साहेब, आपण काये म्हणून वरडतां?’’ आम्ही म्हटले, ‘‘आम्ही दरोबस्त खत लिहीत आहो, डिस्टर्ब न करणे! गर्दन मारली जाईल!!’’ तेव्हापासून शांतता आहे. असो.

पत्र लिहिण्यास कारण की, गेले काही वर्षे आपल्यात विस्तव काही जात नाही, ऐसे चित्र महाराष्ट्रात आहे. आपल्या कारभारास कंटाळोन आमचा दिल खट्टा झाला व आम्ही दुसरीकडे (पक्षी : दुसऱ्या दिशेला! गैरसमज नको!!) मोहरा वळवला. आपले गेल्या चारेक वर्षातले नको ते उद्योग पाहोन आमचा जीव विटला होता. ही ब्याद परस्पर गेली तर बरे, असे आम्हाला वाटत होते. तथापि, थोडके दूर राहोन आपण सतत आमच्या मागे टिमकी वाजवलीत की मी परत येत्ये, मी परत येत्ये!! त्यानेही जीव विटला!! ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ ह्या म्हणीनुसार अखेर आम्ही आपल्यास परत येण्याची परवानगी देत आहो! थांबा, अशी हर्षोन्मादाने किंचाळी मारो नका! उडीदेखील मारो नका!! आम्ही आपल्यासोबत पुनश्‍च चांगले संबंध प्रस्थापित करण्याआधी आमच्या अटी लक्षात घ्या. सदर अटी तुम्हाला जाचक वाटल्यास ही सोयरीक तुटली असे समजण्यास आमची काहीही हरकत नाही. आमच्या अटीशर्तींचे संपूर्ण पालन होणार असेल, तरच आम्हाला ह्या सोयरिकीत रस आहे, अन्यथा नाही, ह्याची नोंद घ्यावी. आमच्या मोजक्‍या अटी अशा :

१. तुम्ही कितीही निवडणुका जिंकल्यात तरी महाराष्ट्रात मोठा भाऊ आम्हीच!
२. दोघेही एकत्र प्रवास करताना विंडो सीट आमच्यासाठी कायम राखीव असेल!
३. आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आम्ही जिंकलो अस्सेच म्हणायचे!! कळले?
४. तुम्ही जिंकलात तर ईव्हीएममुळे आणि आम्ही जिंकलो तर जनतेच्या आशीर्वादामुळे, हे कबूल असेल तरच पुढे जाण्यात अर्थ आहे!!
५. ब्याट आमची आहे! पहिले ब्याटिंग आमचीच असेल!
६. तुम्ही नेहमी एकटप्पी आऊट आणि आम्हाला एकदा नॉटऔट!! ही अट कायमस्वरूपी असेल!
७. आमच्यासमोर कोणीही छप्पन इंची छातीची भाषा करणेची नाही!!
८. आम्ही कित्तीही शिव्यांची लाखोली वाहिली तरी तुम्ही हसरेपणानेच बोलले पाहिजे!
९. तुमच्या गोटातील श्रीमान गिरीशभाऊ महाजन नामक सरदारास पस्तीस उठाबश्‍या काढण्याची शिक्षा ठोठावण्यात यावी! पालघरची आठवण आम्हाला अजुनी त्रास देते!!
१०. कोणीही जिंकले तरी रिमोट कंट्रोल आमच्याच हातात असेल!
११. निवडणुकीनंतर विजय मिळाल्यावर शपथविधीच्या वेळेपासून आमच्या लोकांचे राजीनामे सदऱ्याच्या खिश्‍यात रेडी असतील, ह्याची नोंद घ्यावी!
१२. एवढे होऊनही आमची स्वबळाची भूमिका कायम राहील!
१३. युतीत आमची पंचवीस वर्षे सडली हे खरेच आहे. त्यात आता फक्‍त पाचेक वर्षांची भर पडो, ह्या सदिच्छा!
...उपरोक्‍त अटी तुम्हाला मान्यच असणार, हे आम्ही गृहीत धरलेले आहे. कारण तुम्हाला कुठल्याही अटी मान्यच असणार हे उघड आहे!! तेव्हा यायचे असेल तेव्हा या! घराचा ताबा घ्या...स्वत:च स्वत:चा चहा करून प्या!! कोणीही कपबशी हातात आणून देणार नाही, हे जाणून असा!!
कमळाबाई, आता तरी झाले ना तुमच्या मनासारखे?
आपला उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com