रंगभूमीनं दिलं समाजभान

rasika aagashe
rasika aagashe

आम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध? पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी पुढे आले आणि ‘सत्तारूढ पक्षाला मतदान करू नका, आपसांत तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका,’ अशा आशयाचे पत्रक त्यांनी काढले. लगोलग जवळपास तेवढ्याच कलाकारांनी, ‘सत्तारूढ पक्षाला मत द्या,’ असे पत्रक काढले. असंख्य लोकांनी इंटरनेटवर ‘ट्रोल’ केले की कलाकारांचा यात काय संबंध? तुम्ही नट आहात, आपापलं काम करा इत्यादी. या घटनेने मी अंतर्मुख झाले. आपण नट आहोत, म्हणजे नेमके कोण आहोत, याचा शोध घेऊ लागलो. स्वतःच्या वाटचालीकडे त्या दृष्टीने पाहू लागले. ‘यूथटॉक’च्या माध्यमातून याविषयी व्यक्त व्हावंसं वाटलं.

 मी थिएटर करायला सुरवात केली, तेव्हा मला खरंच माहीत होतं का की कलाकार होणं म्हणजे नक्की काय असतं? मी काय, किंवा माझ्या आसपासचे बहुतेक जण, त्या वेळी रुपेरी पडद्यावर वावरणाऱ्या तारे-तारकांमुळे प्रभावित होतात! अजूनही या क्षेत्रात येणारे बहुतेक तसेच येतात. मलाही एकेकाळी माधुरी दीक्षित जीवापाड आवडत होती. मग स्मिता पाटील, शबाना आझमीही आवडायला लागली. पण त्याआधी शाळेत वगैरे कधी तरी, स्टेजवर भीती वाटत नाही, म्हणून मला कामं मिळायला लागली होती. महाविद्यालयातसुद्धा मला ठामपणे माहीत होतं, की मला नटीच व्हायचं आहे. कारण हेच माध्यम आहे, ज्यात मला अभिव्यक्त होता येतं. खरंतर तेव्हा व्यक्त व्हायचं म्हणजे काय हेही नक्की माहीत नव्हतं. पण लेखकानं लिहिलेल्या ओळी पोपटासारख्या पाठ करून, विविध भावदर्शन घडवता येत होतं. पण म्हणजे मी कलाकार झाले होते काय? ते माहीत नव्हतं; पण नाटक, मालिका, चित्रपट काही ना काही कामं चालूच होती.

खरंतर या प्रश्नाचं उत्तर मी दिग्दर्शन करायला लागले, तोवर मिळालं नव्हतं. कारण तोवर शब्द कोणातरी वेगळ्याचे होते, विषय कोणातरी वेगळ्याचा होता. व्यक्त होण्याचे निर्णय कोणा तरी वेगळ्याचे होते. मी फक्त माध्यम होते. हे प्रश्न आणि उत्तर फक्त माझ्यापुरतं आहे. प्रत्येकानं तो किंवा ती कलाकार आहे म्हणजे काय, याचा शोध वैयक्तिकरीत्या घ्यायचा असतो. तर असा शोध घेताना मी अपघातानं दिग्दर्शक झाले. कारण त्या क्षणी मला जे म्हणायचं होतं, जसं म्हणायचं होतं, ते म्हणायला फक्त नटी म्हणून मी अपुरी पडत होते आणि रंगमंच आणि त्याच्या अवकाशात फिरताना, वारंवार मला याची जाणीव होतं होती, की ही जागा खूप व्यक्त होण्याची आहे. खूप जबाबदारीची आहे. कारण मी म्हणते, की मी काहीतरी निर्माण करू शकते, कलेचं सर्जन करू शकते, तेव्हा हे जबाबदारीच कामं आहे आणि म्हणूनच आसपास घडणारे सर्व प्रसंग, घटना, यांचा संगतवार अर्थ लावून त्यावर प्रतिक्रिया देणे ही सगळी सर्जनात्मक प्रक्रियाच असते. रंगमंचाला मी काय दिलं माहीत नाही. ५, ७, १० नाटकं कदाचित. पण रंगमंचानं मला काय दिलं तर समाजभान! वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जगताना त्यांनी मला दिली ती संवेदनशीलता ! लोकशाहीची मूल्यं आणि घटनेनं दिलेले अधिकार आणि नागरिक म्हणून जगताना पूर्ण करायची कर्तव्ये याची जाणीव मला रंगमंचानं दिली. नाटकातल्या साथीदारांनी दिली आणि कलाकार म्हणून मला सगळ्याच गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे कुणीही कुणाला त्रास दिला, विद्वेष पेटवण्याचा प्रयत्न केला, कुणाला दडपण्याचा प्रयत्न केला, की त्यावर व्यक्त व्हावंसं वाटतं. यालाच मी समाजभान म्हणते. सगळ्यांकडेच असायला हवं! आणि कलाकारांकडे तर असायलाच हवं. काहींना व्यक्त होता येतं, काहींना वेळ लागतो. पण व्यक्त होणं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि आत्ता, ज्या काळात आपण राहतो, तिथं तर खूप गरजेचं आहे व्यक्त होणं! कारण जेव्हा आसपास अन्याय, अराजकता असते, तेव्हा कलाकारांनी दिलेलं योगदान कायमच महत्त्वाचं राहिलं आहे!  जगभरातच हे घडलं आहे. एक कलाकार म्हणून तरुण मित्रांना मी जरूर सागेन, की मतदान अवश्‍य करा. लोकशाहीने तुम्हाला दिलेला तो अधिकार आणि कर्तव्यही आहे.
(लेखिका मुंबईतील नाट्य कलावंत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com