बाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...

बाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या भाषणकौशल्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या आणि कालांतराने देशाच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा निरोप घेतला.

बाळासाहेबांनी आपल्या भाषण कौशल्याच्या जीवावर संपूर्ण भारतातील हिंदू जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. परंतु, त्यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानावरून दसरा मेळाव्यानिमीत्त केलेले शेवटचे भाषण प्रत्येक शिवसैनिकाच्या स्मरणात राहील. कारण; त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या भाषणांपैकी त्या दिवशीचे त्यांचे भाषण हे वेगळे होते. त्यामध्ये थोडा भावनिक सूर होता. शिवसैनिकांना उद्धव आणि अदित्य या दोघांना सांभाळून घेण्याचे आवाहन केलेले होते. यामुळे एकूणच या भाषणाचा सूर बाकीच्या भाषणांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.

त्यांनी म्हटले होते की, आज उद्धवने माझ्या व्यंगचित्राचे पुस्तक तयार केले आहे. त्याची इच्छा होती की, त्याचे प्रकाशन माझ्या हस्ते व्हावे, परंतु तेवढी ताकद आणि शक्तीसुद्धा माझ्या अंगात राहिलेली नाही. ती ताकद आणि शक्ती जर माझ्या अंगात असती तर मी आज नक्की शिवतीर्थावर आलो असतो. 45 वर्षे मी शिवसेनेचा प्रमुख म्हणून काम पाहिले होते. माझं वय 86 वर्षे झाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी आता मला झेपत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तुम्ही मला सांभाळले आहे, मीही तुम्हाला सांभाळले, यामध्ये आपण एकमेकांशी इमान राखले. हे विशेष होते आणि हे इमान तुम्ही जोपर्यंत शिवसेनेसोबत राखणार आहात, तोपर्यंत शिवसेनेला कोणीही हरवू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. पुढे भावनिक होताना त्यांनी म्हटले की, शिवसेनेत घराणेशाही नाही. काँग्रेसने तुमच्यावर घराणेशाही लादलेली आहे, आम्ही तुमच्यावर ती लादली नाही, उद्धवला आणि अदित्यला तुम्ही स्वीकारले आहे. आतापर्यंत तुम्ही मला सांभाळले यापुढे उद्धवला सांभाळा, अदित्यला सांभाळा, आम्हाला महत्व देण्यापेक्षा इमानाला महत्व देण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.

या भाषणात त्यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही सडकून टीका केली. लवासा प्रकरणावरूनही त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, त्यांची बहीण प्रियंका गांधी, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, रॉबर्ट वद्रा आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल या पंचकडीने देशाचे नुकसान केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला होता. पुढे देश वाचवायचा असेल तर, या पंचकडीला देशाबाहेर फेकणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले होते. त्याचबरोर, एमआयएम या पक्षावर टीका करताना त्यांनी नांदेडसारख्या शहरातील महानगरपालिकेत 11 नगरसेवक कसे निवडून येतात, असा प्रश्नही त्यांनी केला होता. ते जाती-धर्माच्या नावावर निवडून येतात, राजकारण करतात मग आपण का नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला होता. 

काँग्रेस नेत्यांवर टीका करत असताना त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कामाचे मात्र त्यांनी कौतुक केले. बांगलादेशच्या निर्मितीमध्ये त्यांनी केलेला हस्तक्षेप हा योग्यच होता, असे बाळासाहेबांनी यावेळी म्हटले होते. पुढे बोलताना त्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत येणाऱ्या निवडणुकीत तिथला महापौर हा शिवसेनेचाच व्हायला हवा असे म्हटले आहे. सीमाप्रश्नावरही त्यांनी यावेळी भाष्य केले होते. शिवसैनिकांनीच सीमाप्रश्नासाठी खरा लढा दिला होता, असे त्यांनी सांगितले होते. शिवसेनेचा लढा हा खरा मराठी माणसांसाठीच आहे आणि म्हणूनच किमान मराठी माणूस तरी कधी शिवसेनेच्या विरोधात उभा राहू नये, मराठी माणूस शिवसेनेच्या छत्रछायेखाली एक व्हायला हवा असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

मतदारांनाही त्यांनी या भाषणात चांगलेच धारेवर धरले होते. कितीतरी लोक पैसे घेऊन मतदान करतात आणि मग नेते निवडून येतात आणि काही काम करत नाहीत, मग आपण त्यांच्या नावाने ओरडत बसतो. हे न करता उलट एखादा नेता जर पैसै घेऊन आला तर त्याच्या कानाखाली मारण्याची तुमची तयारी असायला हवी. त्या नेत्याच्या कानाखाली आवाज काढून तुम्ही सांगायला हवे की, माझे मत ठरले आहे. तुम्ही माझे मत विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जागे व्हा, जगाच्या पाठीवरल्या छोट्या छोट्या देशाचे आदर्श घ्या आणि लढायला शिका असा सल्ला लोकांना त्यांनी दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com