पैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती आनंद देऊन गेल्या, इतिहास अंगाखांद्यांवर बाळगलेली इतकी मैदानं आपल्या देशात आहेत, मग आपण त्या पाऊलखुणा जपत का नाही?

"टीव्हीवर दिसते की मस्त मॅच, भारतात मॅच बघायला जायचं म्हणजे किती त्रास सहन करावा लागतो... बऱ्याच मैदानांना जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही... सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांचा वेडेपणा चालू असतो... आपल्या सीटवर पोचायलाच डोक्‍याचं दही होतं... मग मैदानावर उन्हातान्हात बसून मॅच बघण्यात काय मजा आहे... टॉयलेटची सोय बरोबर नाही... प्यायचं पाणी सहजी मिळत नाही... घरात कसं आरामात बसून खाणंपिणं करत मॅच बघता येतं... काहीही चुकलं, तरी रिप्ले बघता येतो... मैदानात ती सोय नाही... लोक मैदानात जायला इतके का तडफडतात, हे मला नाही कळत,'' माझा एक मित्र मला विचारत होता.

मित्राच्या बोलण्यात जो त्रागा होता, त्याला अर्थ होता थोडासा. भारतात सामना बघायला जाणं म्हणजे अग्निदिव्य असतं. मैदानापर्यंत पोचणं म्हणजे त्रासाची सुरवात असते. नव्यानं बांधलेली बरीच मैदानं शहरापासून लांब आहेत- जिथं नुसतं पोचणं त्रासाचं आहे. सुरक्षेच्या नावाखाली खाण्यापिण्याच्या गोष्टी नेता येत नाहीत. मैदानावर पिण्याचं पाणीच महाग असतं- खाण्याचे पदार्थ तर अजूनच. जिवाचा आटापिटा करून आपल्या सीटवर पोचल्यावरही सामना शांतपणे बघता येईल, खेळाचा निर्भेळ आनंद घेता येईल याची खात्री नसते. कित्येक वेळा वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रेक्षक सामना सुरू झाल्यावर एका तासानं मैदानात येतात किंवा सामना सुरू होण्याअगोदर दोन तास मैदानावर पोचतात. काही प्रेक्षक लांब अंतरावर असलेल्या मैदानावरून सामना संपण्याअगोदर पाऊण तास निघतात जेणेकरून परतीच्या प्रवासात अडकायला होत नाही. सामन्याचा शेवटचा निर्णायक थरार सोडून देताना मनस्वी त्रास होतो; पण पर्याय नसतो.

हे सगळं मनोमन मान्य केलं, तरी सामन्याचा खरा आनंद मैदानावर मिळतो, हे मला ठासून सांगावंसं वाटतं. उदाहरण देतो. पैसे आहेत म्हणून दहा लाख रुपयांची म्युझिक सिस्टिम घरी घेतली आणि त्यावर संगीत ऐकलं, तर आनंद मिळतो; पण शंभर रुपयांचं तिकीट काढून मांडी घालून सवाई गंधर्व महोत्सवात पंडित भीमसेन जोशी यांनी सादर केलेली "बाबुल मोरा' भैरवी ऐकणं किंवा "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' या अभंगाच्या भक्तिरसात भिजून जाणं ही मजा वेगळी असते. घरी सामना बघताना किंवा महागड्या म्युझिक सिस्टिमवर संगीत ऐकताना तुम्ही तिऱ्हाईत असता. मैदानावर जाऊन सामना बघताना किंवा सवाई गंधर्व महोत्सवात जाऊन भीमसेनजींना ऐकताना तुम्ही त्या खेळाच्या किंवा संगीताच्या मैफिलीचा एक भाग असता. हा फरक माझ्याकरता फार मोलाचा आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात मैदानावर जाऊन सामना बघण्यात कमालीचं सुख आहे. बहुतांश मैदानांवर जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. भरपूर मोठी प्रवेशद्वारं असल्यानं मैदानात आत शिरताना प्रेक्षकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागतो. सुरक्षा कर्मचारीही संशयाच्या नजरेनं सतत बघत नाहीत. उलट आत येताना हसून बोलतात. मैदानात खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था असते. सामन्याचा आनंद घेतानाच्या दृष्टिपथात कोणतीही बाधा येत नाही आणि सर्वांत भावणारी गोष्ट म्हणजे प्रेक्षक खेळाडूंना टोमणे मारत, त्यांची निंदानालस्ती करण्यात धन्यता मानत नाहीत. शांतपणे खेळाचा आस्वाद घेण्याकडे त्यांचा कल दिसतो.

इतिहास जपण्याची संस्कृती
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात क्रिकेटचा इतिहास जपण्याची एक संस्कृती आहे. प्रत्येक मैदानावरचे कर्मचारी अत्यंत अभिमानानं त्या त्या मैदानाचा इतिहास सांगत असतात, देदीप्यमान संस्कृतीचा वारसा जपायचा प्रयत्न करत असतात. सामना सुरू नसताना लॉर्डस्‌, ओव्हल या इंग्लंडमधल्या मैदानांवर; तसंच ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न, सिडनी आणि ऍडलेड इथल्या मैदानांवर पर्यटकांकरता सफर आयोजित केलेली असते. अशी उत्तम सफर मॅंचेस्टर युनायटेडला किंवा विंबल्डनलाही आहे. क्रिकेटच्या मैदानावर निदान बरेच दिवस सामने सुरू असतात. विंबल्डनला वर्षातले 15 दिवस स्पर्धा असते. बाकी दिवस सफर आयोजित करून भरपूर पैसे कमावले जातात. फक्त त्याकरता त्या वास्तूचा इतिहास प्रथम जपला गेला पाहिजे. उत्तम समालोचक तयार केला पाहिजे- ज्यानं उत्साहानं, अभिमानानं त्या संस्थेची, त्याच्या इतिहासाची गोष्ट सांगितली पाहिजे.

तीर्थक्षेत्र बॉवरल
मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येतो, तेव्हा वेळात वेळ काढून मी सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या बॉवरल या गावी जातोच. सिडनी शहरापासून दोन तासांच्या अंतरावर बॉवरल गाव आहे. या गावी गेल्यावर क्रिकेट इतिहासाच्या पाऊलखुणांवरून चालल्याचं समाधान मिळतं. बॉवरलला दोन जागा फार मस्त आहेत. एक आहे क्रिकेट हॉल ऑफ फेम. नव्यानं उभारलेल्या या वास्तूत सर डॉन ब्रॅडमन यांच्या 1948 मधल्या अशा ऑस्ट्रेलियन संघाच्या मोठ्या फोटोनं स्वागत केलं जातं- ज्याला "इन्व्हिन्सिबल' संबोधलं जायचं... म्हणजेच "अजेय.' इसवीसन 1948 मध्ये पाच महिन्यांच्या प्रदीर्घ इंग्लंड दौऱ्यात हा संघ सगळे मिळून 34 सामने खेळला होता. त्यापैकी 25 सामने जिंकले आणि 9 अनिर्णित राखले. एकही पराभव या संघानं पत्करला नाही- म्हणूनच त्यांना इन्व्हिन्सिबल ही उपाधी दिली गेली.

क्रिकेट हॉल ऑफ फेम संग्रहालयातली सर्वांत मौल्यवान चीज म्हणजे ब्रॅडमन यांनी वापरलेली पहिली बॅट इथं जपून ठेवण्यात आली आहे. ब्रॅडमन अत्यंत अभ्यासू होते, याचा पुरावा दिसतो. दौऱ्यावर क्रिकेट किटसोबत ब्रॅडमन सोबत स्वत:चा टाइपरायटर घेऊन जायचे. दौऱ्यातली टिपणं ते टाइपरायटरचा वापर करत बरोबर नोंदवून ठेवायचे. इतकंच नाही, तर स्लाइडस्‌ तयार करून स्वत: ते सादर करायचे. या सगळ्या मूळ चीजवस्तू संग्रहालयात जपून ठेवल्या आहेत. क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये दोन खास दालनं आहेत. एकामध्ये "बॉडीलाइन'चा इतिहास चित्रफितीतून समजावला जातो, तर दुसऱ्या भागात कॅरी पॅकर यांनी क्रिकेटला नाट्यमय कलाटणी कशी दिली याची अत्यंत रंजक चित्रफीत दाखवली जाते. शेवटच्या भव्य दालनात जगभरातल्या महान खेळाडूंनी आपली आयुधं या संग्रहालयाला स्मृतिचिन्हं म्हणून अर्पण केली आहेत. याच भव्य दालनात क्रिकेटप्रेमी भूतकाळातल्या विविध निर्णायक सामन्यांच्या चित्रफितींचा आनंद घेऊ शकतात. बॉवरलला ब्रॅडमन यांची दोन घरं पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहेत. आता दोनही घरांची मालकी आणि देखभाल ब्रॅडमन फौंडेशनकडं आहे. बॉवरलला माझ्याकरता सर्वांत भावुक करणारी जागा ओव्हल मैदानातल्या टुमदार पॅव्हेलियनमागं आहे. ब्रॅडमन आणि जेसी नावाची मुलगी बॉवरल गावी 1920 मध्ये पहिल्यांदा भेटले. शाळेत एकत्र जाताना त्यांच्यातली मैत्री वाढली आणि तेव्हाच जेसी हीच आपली जीवनाची साथीदार असल्याचं ब्रॅडमन यांना जाणवलं. 30 एप्रिल 1932 रोजी ब्रॅडमन यांनी जेसीशी विवाह केला. दोघांनी 65 पेक्षा जास्त वर्षं एकत्र सुखानं संसार केला. ""क्रिकेटपेक्षा ही भागीदारी जास्त मोलाची आहे,'' असं ब्रॅडमन जेसीबाबत बोलताना म्हणाले होते. 1997 मध्ये लेडी ब्रॅडमन यांचं निधन झालं आणि 2001 मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांना देवाज्ञा झाली. दोघांच्या इच्छेनुसार त्यांची राख र्ओव्हल मैदानावर आणि मागच्या बागेत विखरून टाकली गेली. गुलाबपुष्पांनी सजलेल्या छोट्याशा बागेत सर डॉन ब्रॅडमन यांचा पूर्णाकृती पुतळा बघताना मन हळवं होतं.

इच्छाशक्तीचा अभाव
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाला आल्यावर मी अशा संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देतो तेव्हा वाटतं, की किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे. किती अभिमान आहे यांना इतिहासाचा. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती आनंद देऊन गेल्या, इतकी इतिहास अंगाखांद्यांवर बाळगलेली मैदानं आपल्या देशात आहेत, मग आपण त्या पाऊलखुणा जपत का नाही?
सौरभ गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे; तसंच तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही आहे. मग कोलकात्याच्या इडन गार्डनवर लॉर्डस्‌ मैदानाला आयोजित केलेली असते, तशी टूर आयोजित का केली जात नाही? महान विजयांपासून ते लक्ष्मण-द्रविडच्या अजरामर भागिदारीबद्दल कहाण्या का सांगितल्या जात नाहीत? इडन गार्डनवर एक संग्रहालय का नाही तयार केलं जात- ज्यात ऑस्ट्रेलियन संघाला गोलंदाजी करताना हादरवून सोडणाऱ्या हरभजनसिंगचे बूट ठेवले जातील? का नाही लक्ष्मण आणि द्रविडच्या भागिदारीच्या वेळी वापरलेल्या बॅट किंवा शर्ट तिथं अभिमानानं ठेवले जात?

वानखेडे स्टेडियमवर 2011 मध्ये भारतीय संघानं विश्‍वकरंडक अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. का नाही त्या वेळची कहाणी कोणी पर्यटकांना सांगत? का नाही झकास संग्रहालय तयार करून महेंद्रसिंग धोनीनं दिलेलं खास स्मृतिचिन्ह तिथं सादर केले जात? मुंबई क्रिकेटच्या इतिहासाची रंजक कहाणी क्रिकेट चाहत्यांना का नाही सांगितली जात?

खरंच राग येतो, की बीसीसीआय म्हणा किंवा स्थानिक क्रिकेट संघटना म्हणा- इतिहास सांगायला किंवा संस्कृती जपायला काहीच करत नाहीत. कोणालाच उत्साह नाही, की रसिकता नाही. नेहमी असे प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाची समस्या असते. भारतीय क्रिकेटमध्ये पैसा तिजोरीतून ओथंबून वाहतो आहे. म्हणजे संग्रहालय किंवा स्टेडियमच्या रंजक टूर्स आयोजित न करण्यामागं एकच कारण आहे ते म्हणजे भारतातल्या क्रिकेट संघटना आणि त्यांचे मोठे पदाधिकारी अरसिक आहेत. बीसीसीआयला ओरडून सांगावंसं वाटतं, की खूप उशीर झालाय... वेळ निघून जातेय...अजून जागे व्हा आणि भारतीय क्रिकेट इतिहासाच्या पाऊलखुणा जपायला पावलं उचला. सांगण्यासारखं, दाखवण्यासारखं खूप काही आहे...गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि थोड्याशा रसिकतेची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com