वैकुंठधामात लाकडे नसल्याने मृतदेह तीन तास पडून

जळगाव - नेरी नाका वैकुंठधामात अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने संताप व्यक्त करताना मृताचे नातेवाइक.
जळगाव - नेरी नाका वैकुंठधामात अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने संताप व्यक्त करताना मृताचे नातेवाइक.

जळगाव - नेरी नाका वैकुंठधामात आज लाकडे नसल्याने तीन तास मृतदेह पडून राहिल्याने नागरिकांना ताटकळावे लागले. अखेर नातेवाइकांनी अन्य वखारीमधून लाकडे आणून अंत्यविधी उरकवला. दरम्यान, लाकडे पुरविणारा ठेकेदार व नागरिकांमध्ये शाब्दिक वाद होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेरी नाका येथील महापालिकेच्या वैकुंठधामात लाकडांचा पुरवठा करणाऱ्या खासगी ठेकेदाराला तीन दिवसांपासून लाकडे मिळत नाही. आज सकाळी साडेदहाला दादावाडी येथील गंगूबाई वडेवार या महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी आला असता सरपन नसल्याचे ठेकेदारांनी सांगितले. तसेच दुपारी साडेबाराला जुने जळगाव येथील शंकर कोळी यांच्यावर अंत्यविधीसाठी नातेवाईक आले. परंतु लाकडेच नाही. तुम्ही बाहेरून वखारीतून लाकडे आणावे असे सांगितले. यावरून नातेवाईक व नागरिकांचा संताप अनावरण झाला. महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील विचारणा केली असता गेल्या पाच सहा वर्षापासून खासगी मक्तेदारांकडून सरपण दिले जाते असल्याचे सांगण्यात आले. 

वनविभाग, व्यावसायिकाचे त्रांगडे
लाकडांची ऑर्डर गेल्या पाच- सहा दिवसापासून केली आहे. परंतु वन विभाग व लाकडे देणाऱ्या व्यावसायिकांमध्ये वाद सुरू असल्याने पैसे देवून देखील लाकडे मिळालेली नाही असे सरपन पुरविणाऱ्या ठेकेदारांचे म्हणणे आहे. अजून चार-पाच दिवस लाकडे येणार नसल्याची शक्‍यता आहे. नाइलाजाने नागरिकांना अन्य वखारीतून लाकडे आणावे लागेल असे ठेकेदारांनी सांगितले.

अंत्यविधीसाठी लाकडे मनपाने द्यावे
शहरात अनेक विकास कामांचे सत्ताधारी कामांचे घोषणा करत आहे. परंतु एक-दोन विकास कामे कमी करून वैकुंठधामात अंत्यविधीसाठी लाकडे मोफत देण्याची सुविधा महापालिकेने करावी अशी मागणी यावेळी मृतांच्या नातेवाइकांनी केली. गरीब व्यक्ती अंत्यविधीसाठी जादा पैसे कोठून आणतील असा प्रश्‍न देखील यावेळी उपस्थित केला. 

लाकडे परस्पर अन्य वखारीत
वैकुंठधामात सुरू असलेल्या गोंधळात नागरिकांनी ठेकेदारावर आरोपाच्या फायरी झाडल्या. यात स्मशानभूमीतील लाकडे तुमच्या अन्य वखारींमध्ये परस्पर पाठविले जात आहे. तीन दिवसापासून लाकडे नाही तर अन्य ठिकाणांवरून लाकडे का आणले नाही, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केल्याने काही वेळासाठी गोंधळ उडाला होता. 

मोफत लाकडे बंद
वैकुंठधामात महापालिकेतर्फे पूर्वी अंत्यविधीसाठी लाकडे दिली जात असे. परंतु मनपाच्या लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविला गेल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती. सरपनासाठी तिथे एका ठेकेदाराची नेमणूक करून पंधराशे रुपये पावतीनूसार सरपन देण्याची सेवा आहे. पुन्हा लाकडे मोफत देण्याबाबत आमदार सुरेश भोळे प्रयत्नशील असून देखील अद्याप शासनाकडून उपविधी मंजूर नसल्याने अडथळा येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com