कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी

नाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही चालवली; पण प्रवाशी नेण्याच्या वादात रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा उजव्या हाताचा खुबा निकामी झाला आणि कुटुंब सांभाळण्यासाठी व दैनंदिन गुजराण करण्यासाठी पुन्हा तिला रिक्षाचा आधार घ्यावा लागला. आजही ती यशस्वीपणे आपल्या कुटुंबाचे सारथ्य करते आहे. जवळपास वीस वर्षांपासून विविध संकटांशी सामना करत, दोन मुलांचे संगोपन करणाऱ्या रिक्षाचालक महिलेचा संघर्षाचा प्रवास इतर महिलांना त्यांच्या आयुष्यात बळ देणारा आहे.

ही कहाणी आहे... कधीकाळी महाविद्यालयीन हॉकी संघाची गोलकिपर आणि ॲथलिट म्हणून मैदान गाजविणाऱ्या पंचवटीतील विडी कामगार वसाहतीतील कल्पना यशवंत नेमाडे या एका पदवीधर रिक्षाचालक महिलेची. सध्या आजारी मुलाऐवजी स्वतःच रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह ती करते. कल्पना या अर्थशास्त्रातील पदवीधर आहेत. केटीएचएम महाविद्यालयात असताना क्रीडांगण गाजविणारी ही महिला वीस वर्षांपासून एक मुलगा व एका मुलीसह राहते. दोन मुलं टाकून पती परांगदा झाला. घर चालविण्यासह कॉन्व्हेंटमधील मुलांचे संगोपन करण्यासाठी मिळेल ते काम करून चारितार्थ चालवावा लागला. मुलगी शिकली, इंजिनिअर झाली. मुलाला मात्र अर्ध्यातूनच शाळा सोडावी लागली. घराला मदत म्हणून मुलगा रिक्षा शिकला. मुलगा कर्ता झाला म्हणून त्याला तिने रिक्षा घेऊन दिली. दोन महिने सगळे सुरळीत चालले. मात्र, रिक्षा थांब्यावर नंबरमध्ये असूनही प्रवाशांना भाडे आकारण्याच्या कारणावरून इतर काही रिक्षाचालकांशी वाद झाला, त्यात मुलाचा उजव्या हाताचा खुबा निकामी  झाला.

जिद्दीमुळे उभारी
घरखर्चासह मुलाचे औषधोपचार करण्यासाठी तिने स्वतःच जिद्दीने रिक्षा चालविण्यास सुरवात केली. तरुण मुलींना गंडविणाऱ्या एका महिलेचा भंडाफोड करत पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापोटी तिला स्वतःलाच नको त्या आरोपांना सामोरे जावे लागले. काही कामे हातची गेली. मुलीच्या शिक्षणासाठी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी परांगदा झालेल्या पतीच्या उत्पन्नाचा दाखला हवा, यासाठी अडवणूक झाली. सहानुभूती म्हणून काही ठिकाणी नोकरीची संधी मिळाली, मात्र कुटुंबातील इतरांनीच त्या संधीचा लाभ घेत स्वतःचीच मुले तेथे लावली. अशा अनेक अडचणींचा सामना करतानाच कुणाविषयी तक्रार न करता कल्पना यांचा आयुष्याशी संर्घष सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com