कॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच "बूस्टर'...! 

कॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच "बूस्टर'...! 

जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद कमी झाले ही एक चांगली बाब वगळता निवडणुकीतील यशाचा सूर अद्यापही पक्षाला गवसलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नेतृत्व बदलाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. या बदलामुळे यश मिळेल, अशी अपेक्षा असली तरी पक्षाची अंतर्गत सांघिकता खऱ्या अर्थाने दिसून येण्याची गरज आहे. त्याची परीक्षा निवडणुकीतच दिसून येते. त्यातून पक्षाला ताकदही मिळते, हेच "बूस्टर' मिळण्यासाठी पक्षाला "लोकसभा' लढविण्याची आवश्‍यकता आहे. 
 
कॉंग्रेसची ताकद आज देशात व राज्यात कमकुवत झाली आहे. परतु सत्ता असतानाही अंतर्गत वादामुळे क्षीण झालेल्या जळगाव जिल्हा कॉंग्रेसची अवस्था आज अत्यंत बिकट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देश आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या चार वर्षांत कॉंग्रेसच्या नेत्यांना आपली ताकद आता कमी झाली असल्याचे राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांना दिसून आले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात पक्ष उभा करण्यासाठी अधिक श्रम घेण्याची गरज आहे, हे पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या बैठकीत आपण जळगावकडे लक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी कृतीही केली होती. अगदी महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाचा मेळावाही घेतला होता. यात राज्यातील पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. अगदी त्यांनी पक्षाचे नेते आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर जबाबदारीही सोपविली होती. तरीही पक्षाला एक नगरसेवकही निवडून आणता आला नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कोणाला दोष न देता पुन्हा बळकटीसाठी तयारी केली. अगदी पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा जिल्ह्यातील फैजपूर येथून सुरू करून पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील व स्वत: चव्हाण उपस्थित होते. यातून पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते "रिचार्ज' झाले. या शिवाय पक्षातर्फे जिल्ह्यात सरकारविरोधात विविध आंदोलनेही करण्यात आली. यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग दिसून आला. मात्र कार्यकर्त्यांची संख्या नगण्यच असल्याचे चित्र दिसत होते. 
सत्ता गेल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही नेतृत्वात बदल झाला. चोपड्याचे ऍड. संदीप पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. कमकुवत असलेल्या पक्षात "जान' फुंकण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. मात्र गेल्या चार वर्षांत त्यांच्याकडून पक्षाला निवडणुकीच्या माध्यमातून यशाची ताकद देता आलेली नाही. मात्र पक्षातील अंतर्गत असलेले वाद कमी करण्यात त्यांना यश आले. अगदी अंतर्गत विरोध करणारे एकाच व्यासपीठावर बसू लागले. हीच त्यांची एक जमेची बाजू म्हणता येईल. 
पक्षाचे अंतर्गत वाद कमी झाले असले तरी पक्षाला खरी ताकद मिळते, ती निवडणुकीतील विजयातूनच. परंतु जिल्ह्यात अद्यापही तरी पक्षाला तो सूरच गवसलेला नाही. जिल्ह्यात झालेल्या पालिका आणि महापालिका निवडणुकीतही पक्षाला काहीच हाती लागले नाही. अर्थात याची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची असते, हे निश्‍चित आहे. त्यामुळे आता अपयशाला जबाबदार धरून जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी होत आहे. अर्थात त्यात बदल करून पक्षाला लगेच आगामी निवडणुकीत ताकद मिळेल, अशी अपेक्षा करणे कितपत योग्य आहे, हा मात्र पक्षांतर्गत प्रश्‍न आहे. मात्र पक्षाच्या सांघिकतेकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद मिटले आहेत, ते एकाच व्यासपीठावरही बसत आहेत. परंतु त्यांच्यात अद्यापही एकतेने काम करण्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे काहीअंशी यश पक्षापासून दूर जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 
पक्षाला खरी ताकद मिळवायची असेल तर निवडणुका लढल्याच पाहिजे, असे म्हटले जाते. त्यामुळे जिल्ह्यात आता कॉंग्रेसला आपली खऱ्या अर्थाने जनतेत सांघिक ताकद दाखविण्यासाठी निवडणूक लढण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जिल्ह्यात लढण्याची गरज आहे. आघाडी झाली नाही तर दोन्ही जागा पक्षाला स्वतंत्र लढाव्याच लागणार आहेत. अर्थात त्यावेळी खऱ्या अर्थाने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकतेची कसोटी लागेलच. परंतु "राष्ट्रवादी'समवेत कॉंग्रेसची आघाडी झाली तर मात्र जिल्ह्यात पक्षाला लढाईत उतरणे शक्‍य नाही. दोन्ही मतदार संघ "राष्ट्रवादी'कडे आहेत. त्यामुळे आघाडी झाली तरीही पक्षाने जिल्ह्यात एक जागा लढण्याची ताकद दाखविली पाहिजे. रावेर लोकसभा मतदार संघासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. निवडणुकीत यश किंवा अपयश या दोन बाजू आहेत. मात्र त्यासाठी रणांगणात उतरले पाहिजे. लढाई केली तर कार्यकर्त्यांतही चेतना निर्माण होते. व्यासपीठावर एकत्र बसण्यापेक्षा पक्षाची सांघिकता मैदानातच खऱ्या अर्थाने दिसून येते. त्यामुळे कॉंग्रेसला ताकदवान होण्यासाठी तरी लोकसभा निवडणूक उतरण्याची गरज आहे. जय किंवा पराजय हा भाग वेगळा असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही लोकसभा लढणे हे खऱ्या अर्थाने कॉंग्रेसला "बूस्टर' असणार आहे; अन्यथा जिल्ह्यात कॉंग्रेसला पुढच्या निवडणुकीत उमेदवारांचाच नव्हे तर कार्यकर्त्यांचा शोध घेण्याची वेळ येईल, एवढे मात्र निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com