खडसे "स्टार प्रचारक', मग निर्दोषत्व का नाही? 

खडसे "स्टार प्रचारक', मग निर्दोषत्व का नाही? 

राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्यात आले. ते या सर्व आरोपातून निर्दोष सुटल्याचा दावाही करीत आहेत. मात्र भाजप सरकारने निष्पक्षपणा दाखवत त्यांना निर्दोष जाहीर करण्याची हिंमत दाखविली नाही. मात्र, दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांचे नाव "स्टार प्रचारक' यादीत टाकले असून, त्यांच्या नावाने पक्षाने हेलिकॉप्टरही बुकिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. 
... 

लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांतर्फे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली असून, जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. भाजप-सेनेच्या युतीबाबतही चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत पक्षातर्फे प्रचाराची तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षानेही राज्यात प्रचारासाठी नियोजन केले आहे. प्रचाराच्या जाहीरसभेसाठी "मास'लीडर आवश्‍यक असतात. एके काळी भाजपमध्ये (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, नितीन गडकरी अशी मोठी फळीच होती. त्या काळी सत्ताधारी कॉंग्रेस सरकारवर आसूड ओढत या नेत्यांनी सभा गाजवून पक्षाच्या उमेदवारांना यशही मिळवून दिले होते. मात्र, आता यापैकी एकनाथराव खडसे, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे हे राज्यात पक्षाचे मास लिडर आहेत. आगामी निवडणुकीत प्रचाराची धुरा राज्यात त्यांच्याच खांद्यावर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्या प्रचाराचे नियोजन केले असून, त्यांना हेलिकॉप्टरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे बुकिंग पक्षाने आतापासून केले असून, त्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही पक्षातर्फे प्रचारासाठी हेलिकॉप्टर देण्यात येणार आहे. 

कॉंग्रेस नेत्यांकडून माहिती 
विशेष म्हणजे ही माहिती विरोधी पक्षातर्फे "हेलिकॉप्टर' बुकिंगसाठी संबंधित कंपनीकडे माहिती घेत असताना समोर आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवर पदाधिकारी असलेल्या नेत्याने राज्यातील प्रचारासाठी पक्षाच्या नेत्यासाठी एका कंपनीला हेलिकॉप्टर बुकिंगसाठी माहिती घेतली असता त्यांनी हेलिकॉप्टर बुकिंगची माहिती दिली. त्यात जळगावसाठी एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर बुकिंग केल्याचे सांगण्यात आले. 

श्री. खडसे हे पक्षाचे मास लिडर आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होत असते. त्यामुळे पक्ष ती "कॅश' करण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यातील शेतकरी सरकारवर नाराज असल्याची स्थिती आहे. त्यामुळे भाजपच्या ग्रामीण मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील शेती, सिंचन याबाबत खडसे यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि सरकारने केलेले कार्य याबाबतचा मुद्दा ते चांगल्या पद्धतीने मांडतील, हे हेरून पक्षातर्फे राज्यभर त्यांच्या सभा आयोजित करण्यात येतील. त्या दृष्टीने पक्षाला त्यांचे महत्त्व माहीत आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर असलेल्या सर्व किटाळातून ते निर्दोष असल्याचे सांगण्यात आले. तथापि, शासकीय स्तरावर ते अधिकृतरीत्या जाहीर करण्याची हिंमत सरकारने दाखविली नाही. आपण दोषी असू तर शिक्षा द्या, अन्यथा निर्दोष असल्याचे अधिकृतपणे जाहीर करावे, अशी मागणी खडसे करीत आहेत. जाहीर सभेत त्यांनी आपले मत व्यक्तही केले आहे. मात्र पक्षातर्फे तशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असतानाच सर्व आरोपातून ते निर्दोष असल्याचे पक्षातर्फे आता तरी जाहीर होणार काय, याचीच आता प्रतीक्षा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com