श्रमदानासाठी तृतीयपंथीही सरसावले अन् उत्साह वाढला 

mehunbare
mehunbare

मेहुणबारे (जळगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने काल (1  मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व तृतीयपंथीसह सुमारे अडीच हजार ग्रामस्थांनी महाश्रमदान केले. तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील हे देखील यात सहभागी झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून आला. या कामामुळे भविष्यात तांडावासीयांचा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. 

अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे काल (१ मे) सकाळी सातपासून ते सायंकाळी सहापर्यंत श्रमदान करण्यात आले. यासाठी मुंबई, पुणे, यवतमाळ, जळगाव, भडगाव, पाचोरासह चाळीसगाव तालुक्यातील जलमित्र, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातच पाणी कमी झाले आहे. त्यामुळे त्याचे पुनर्भरण होण्यासाठी पाणी फाउंडेशनने जलव्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अभोणे गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून या कार्यासाठी महिला संघटनांनी देखील श्रमदानात हातभार लावत नवनिर्माणाचा चंग बांधला आहे. येथील बंजारा बांधवांमध्येही यानिमित्ताने उत्साह दिसून आला. 

आमदारांनी केले श्रमदान 
चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील हे सकाळी नऊला अभोणे तांडा येथे आल्यानंतर त्यांनी सुमारे तासभर श्रमदान केले. आमदार पाटील यांनी टिकावाने खोदण्याच्या कामासह काही ठिकाणी माती देखील फेकली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसह महिलांशी संवाद साधून त्यांचा श्रमदानातील उत्साह वाढवला. पाणी फाउंडेशनचे तालुका प्रमुख विजय कोळी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कळमडू गावाचे सुपुत्र तथा पुणे येथे संगणकीय अभियंता असलेले गुणवंत सोनवणे हे नावाप्रमाणेच गुणवान असल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. श्रमदानासाठी तालुका कृषी अधिकारी साठे, वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. 

पोलिसांनी केले श्रमदान 
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या संपूर्ण स्टाफने सकाळी ८ ते ११ असे तीन तास श्रमदान केले. पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्यासह २७ पुरुष व ३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग नोंदवला. अशा उपक्रमातून पोलीस व जनता यांचे संबंध अधिक सुदृढ होतात. स्वत:ला व सहकाऱ्यांना पाण्याचे महत्त्व समजून त्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती मिळते असे जयपाल हिरे यांनी सांगितले. मेहुणबारे पोलिसांनी बांध क्रमांक ५ ची उंची वाढवण्याचे काम केवळ तीनच तासात पूर्ण केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. 

तृतीयपंथीही सरसावले..... 
अभोणे तांडा येथे निर्भया फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील २६ तृतीयपंथीयांनी आजच्या श्रमदानात सहभाग घेतला. दुपारी बाराला रणरणत्या उन्हात महाश्रमदान केले. माणुसकी हाच खरा धर्म असून तो आपण जपला पाहिजे. आम्ही देखील आपल्यातीलच एक आहोत हा संदेश तृतीयपंथीयांनी श्रमदानातून देत, अशा कार्यासाठी आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्‍वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. 

जलव्यवस्थापन करण्याचे मोठे कार्य उभारण्यात येणार आहे. मदतीशिवाय किंवा नियोजनाशिवाय हे कार्य शक्य नाही. त्यामुळेच महाश्रमदान यशस्वीरीत्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आता ‘एकच क्रांती, जलक्रांती’ हा आपला नारा आणि हेच आपले ध्येय राहणार आहे. 
- गुणवंत सोनवणे, संगणक अभियंता, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com