file photo
file photo

मेळघाटच्या राख्यांमधून रोजगाराची कास

अमरावती : कुपोषण, स्थलांतर तसेच बालमृत्यू एवढ्यापुरतीच नकारात्मक ओळख असलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आपल्या कल्पकतेतून एक नवीन ओळख निर्माण केली आहे. बांबूपासून निर्मित आकर्षक राख्या यंदा रक्षाबंधनासाठी सज्ज झाल्या असून, या राख्यांच्या माध्यमातून मेळघाटमधील आदिवासी बांधवांना घरच्या घरीच रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
मेळघाटातील अतिदुर्गम लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्र तसेच अंबाकार्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रक्षाबंधनासाठी खास पर्यावरणपूरक राख्या ऑनलाइन तसेच स्टॉल्सच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सातासमुद्रापलीकडे ऑनलाइन बुकिंगनेसुद्धा बांबूपासून निर्मित पर्यावरणपूरक राख्या उपलब्ध होणार आहेत. मागील 24 वर्षे मेळघाटातील दुर्गम गावांमध्ये राहून संपूर्ण बांबू केंद्राची निर्मिती करणारे सुनील देशपांडे म्हणाले की, मेळघाटातील कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. बाहेर गेलेल्या अनेक महिलांचे शोषण केले जाते. अनेकजण घरीच परतत नाहीत. मुलाबाळांचे आबाळ होते. अशा स्थितीत मेळघाटातील महिला व पुरुषांना त्यांच्या घरीच रोजगार उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सुटू शकणार आहे. त्यासाठीच अमरावतीकरांनी यंदा मेळघाटच्या राख्यांची खरेदी करावी, विशेष म्हणजे तब्बल 10 हजार राख्या सीमेवरील जवानांनासुद्धा पाठविण्यात येणार आहेत. "मेड इन चायना' राख्या खरेदी न करता आदिवासी बांधवांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या राख्यांनीच यंदाचे रक्षाबंधन साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन सोबतच खापर्डे बगीचा परिसरात स्टॉलच्या माध्यमातून या राख्या विकत घेता येणार आहेत. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या या राख्यांमध्ये कुठलाही अनैसर्गिक रंग नसून तीन महिन्यांपासून 50 कुटुंबांतील सदस्य या राख्या साकारण्यासाठी झटत आहेत. 30 पेक्षा अधिक डिझाइन्समध्ये त्या साकारण्यात आल्या असून किंमत अगदी खिशाला परवडेल, अशी राहणार आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांना देणगी देण्यापेक्षा त्यांना मेहनतीने तयार केलेल्या वस्तू खरेदी करून सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, असे आवाहन सुनील देशपांडे तसेच अंबाकार्टचे संजय गुंबळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com