इंग्रजी माध्यमाचे पेपर सोडवा मराठीतून!

Exam
Exam

नागपूर - इंग्रजी माध्यमाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिताना इंग्रजी भाषा अवघड वाटल्यास आपल्या मातृभाषेतूनही पेपर सोडविता येणार आहे. राज्याच्या शिक्षण मंडळाने विज्ञानासह ६५ विषयांचे उत्तर मराठीतून लिहिण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यासाठी परीक्षेचा अर्ज करताना ०२ असा सांकेतांक टाकणे गरजेचे राहणार आहे. 

महाराष्ट्रात इंग्रजी माध्यम घेतल्यास सर्वच विषयांची उत्तरे इंग्रजी भाषेतच लिहिणे बंधनकारक होते. इंग्रजी भाषेचे अपुरे ज्ञान आणि सराव नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची अडचण व्हायची. पर्यायी शब्दही वापरायची सोय नव्हती. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर मराठीतून इंग्रजी माध्यमात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला बरेचदा ते जड जाते. मुळात प्रत्येक विषय हा इंग्रजीमधूनच शिकविला गेला पाहिजे असा कुठेही नियम नाही. मात्र, शिक्षकांकडून ते शिकविले जात नाही. त्यामुळेच बोर्डाने अशा विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी प्रश्‍नपत्रिकेत बऱ्याच तांत्रिक शब्दांच्या बाजूला मराठीत त्याचा प्रतिशब्द कंसात देण्याचे ठरविले आहे. तसेच मराठी भाषेतून उत्तर लिहिताना मराठीतील शब्द न आठवल्यास तो शब्द इंग्रजीमधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बारावीचा अर्ज भरताना, या विषयांपुढे (०२) असा सांकेतांक लिहावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा सांकेतांक टाकला, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बाकावर ‘उत्तराची भाषा मराठी’ अशी प्रश्‍नपत्रिका उपलब्ध होणार आहे.

गुणवत्ता वाढणार 
विद्यार्थ्यांना मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये मराठीतून उत्तरे लिहायला मिळाल्यास, त्या विषयाबद्दल अधिक व्यक्त होता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार आहे. 

मुळात विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची मुभा देण्याच्या उद्देशाने बोर्डाने घेतलेला निर्णय अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. त्यातून विद्यार्थ्यांना फायदाच होणार असून बोर्डाचे आभार. 
- अनिल गोरे, शिक्षणतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com