Suicide
Suicide

प्रेमी युगुलाची फुटाळ्यात उडी घेऊन आत्महत्या

नागपूर - प्रेमी युगुलाने हाताला हात बांधून फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आज मंगळवारी पहाटे आठ वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. चेतन विनोद मेत्रे (वय २३, बिनाकी मंगळवारी) आणि भारती मोती केळवदकर (वय १८, रा. शांतीनगर) अशी प्रेमी युगुलाची नावे आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास एका नागरिकाला २० ते २२ वर्षे वयोगटातील युवक व युवतीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अंबाझरी पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर अंबाझरी पोलिसांनी अग्निशमनदलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

धक्कादायक म्हणजे मृतदेह बाहेर काढले त्यावेळी दोघांचे हात एकमेकांना बांधलेले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांनी एकमेकाला एकत्र बांधून तलावात उडी घेतली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून चेतन आणि भारतीच्या आई-वडिलांना संपर्क साधून माहिती दिली. ताबडतोब दोघांचेही पालक फुटाळा तलावावर पोहोचले. त्यांनी मृतदेह पाहताच ओळख पटविली.  

कुटुंबीयांचा होता प्रेमास विरोध 
चेतन हा पदवीचे शिक्षण घेत होता तर भारती ही बारावीची विद्यार्थिनी होती. दोघांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. चेतनच्या आईवडिलांनी परवानगी दिली तर भारतीच्या आईवडिलांचा लग्नास विरोध केला. तिला चेतनसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकला. 

ओळख न पटण्यासाठी खटाटोप
युवक व युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी ओळख पटू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली. ओळख लपवण्यासाठी मोबाईलचे सिमकार्डदेखील काढून फेकले. दोघांकडे एकही कागदपत्र किंवा कोणतेही ओळखपत्र सापडले नाही. परंतु, चेतनच्या खिशात सापडलेल्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरवरून पोलिसांनी दोघांचाही पत्ता शोधून काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com