अहमदनगर : जप्त मुद्देमालाचे होतेय काय?

या मालाचे पुढे काय होते, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो.
 confiscated issue
confiscated issuesakal

अहमदनगर : पोलिसांकडून विविध गुन्ह्यांत रोख रक्कम, दारूचे ड्रम, वाहने, सोने, मोबाईल, हत्यारे, चंदन असा मुद्देमाल जप्त केला जातो. या मालाचे पुढे काय होते, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. याबाबत कायद्यात तरतुदी असून, संबंधित मालाची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती आहेत. या मुद्देमालाचा प्रवास अनेकदा रखडतो, तर कायद्याच्या कचाट्यात सापडून तो नष्टही करावा लागतो.

मालमत्ता, सोने- चांदी आदी मौल्यवान धातू, हिरे आदी, वनविभाग, अमली पदार्थ, दारू, वाहन, गौण खनिज, इंधनासंबंधित गॅस, पेट्रोल, डिझेल, स्फोटक पदार्थ, सायबर क्राइमशी संबंधित असलेल्या गुन्ह्यात मोबाईल, संगणक आदी साहित्य पोलिसांना मुद्देमाल म्हणून ताब्यात घ्यावे लागते. या मुद्दे मालाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर विभागांचीही महत्त्वाची भूमिका असते. मात्र, इतर विभागांशी समन्वय साधला जात नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलिस ठाण्यात आवारात आणि पोलिसांच्या ताब्यात पडून राहतो. या वस्तूंची विल्हेवाट लावण्यामध्ये पोलिस, न्यायालय आणि इतर विभागांची महत्त्वाची भूमिका असते.

५४ लाखांच्या मुद्देमालाची विल्हेवाट

पोलिस अधीक्षकांनी ता. १० मार्चपासून मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यामध्ये ५३ लाख ९२ हजार १३९ रुपयांच्या मुद्देमालासह विल्हेवाट लावण्यात आली आहे. दोन हजार ८७२ वस्तूंचाही समावेश आहे. सोने-चांदीचा ६२० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल १९ लाख ७२ हजार रुपयांचा होता. सात लाख ५४ हजार ३५१ रुपये मूळ फिर्यादीला देण्यात देण्यात आले आहेत. पाच लाख ९५ हजार ५६० रुपये न्याय प्रविष्ट आहेत. ३१७ दुचाक्या मूळ मालकांना देण्यात आल्या आहेत. ६७ चारचाकी वाहने मूळ मालकांकडे देण्यात आली आहेत.

दारू संदर्भातील १ हजार ५१९ मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ४९ लाख ७८ हजार ६१ रुपयांचा मुद्देमाल होता. बेवारस असलेल्या २२२ वाहनांचा लिलाव करण्यात आला. मटका, जुगार आदी अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये पाच लाख ७२ हजार ९७३ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम बँक खात्यात जमा केलेली आहे. मारहाण आदी संबंधित गुन्ह्यांमध्ये काठ्या, तसेच इतर साहित्याचा वापर केला जात असतो, असा मुद्देमाल न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अमली पदार्थाच्या ५८ गुन्ह्यांमधील एक हजार ६०३ किलो २६ ग्रॅम गांजा आणि अफू नष्ट केला. २३ लाख ३४ हजार ५२० रुपये किमतीचा माल नष्ट केला आहे.

मुद्देमाल मिळवण्यासाठी कायद्यातील तरतूद

फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ४५१, ४५२ आणि ४५७ मध्ये याबाबत तरतूद आहे. ४५१ या कलमानुसार एखाद्या गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयात हजर केल्यानंतर तो मिळवण्यासाठी संबंधिताला न्यायालयात अर्ज करून मालकी हक्क सिद्ध करावा लागतो. त्यानंतर न्यायालय हा माल देण्याबाबत योग्य तो आदेश देतात.

कलम ४५२ - जीविताशी संबंधित असलेल्या खून, मारहाण करणे अशा गुन्ह्यात न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर या गुन्ह्यात वापरलेली साधने विल्हेवाट लावण्यासाठी आदेश दिला जातो किंवा एखाद्या व्यक्तीने त्या मालमत्तेवर हक्क दाखविल्यानंतर मालमत्ता देण्याची तरतूद आहे.

कलम ४५७ -एखाद्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिस ठाण्यात जमा असल्यास संबंधित तो मुद्देमाल मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो. न्यायालय ठराविक रकमेच्या बॉण्ड वरती तो मुद्देमाल संबंधिताला देण्याबाबत आदेश करत असते, असे ॲड. अंकिता अभिषेक सुद्रिक यांनी सांगितले.

अशी होते विल्हेवाट

मांस असेल, तर त्याचा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवला जातो. उर्वरित मांस नष्ट केले जाते.

अमली पदार्थ ः गांजा, चरस, अफू अशा अमली पदार्थाचा साठा जप्त केल्यानंतर हा साठा पोलिस ठाण्यात ठेवण्याची सुविधा नाही. पोलिस मुख्यालयात असलेल्या गोडाऊनमध्ये सुरक्षिततेसाठी ठेवला जातो. या पदार्थांची पुनर्विक्री केली जात नाही. या पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी शासकीय स्तरावर असलेल्या समितीच्या उपस्थितीत जाऊन हा साठा नष्ट केला जातो. या प्रक्रियेचे पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. उच्च तापमान असलेल्या औद्योगिक भट्टीमध्ये हा साठा नष्ट केला जातो.

चंदन, हस्तिदंत, साप आदींबाबत वन विभागाशी संपर्क केला जातो. या कारवाईच्या वेळेस वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. वन विभागाशी संबंधित असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल हा न्यायालयाच्या आदेशानंतर वन विभागाच्या ताब्यात दिला जातो. वन विभागाच्या अलिबाग (जि. रायगड) येथील गोडाऊनमध्ये या वस्तू पाठवल्या जातात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील लिलावात या वस्तूंची विक्री होत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com