आणखी साठ हजार खातेधारक ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नोटाबंदीनंतरच्या काळात खोटे रोख व्यवहार करणाऱ्या 60,000 व्यक्ती सापडल्या आहेत. यामध्ये 1,300 व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार केले आहेत तर 6,000 लोकांनी मालमत्ता खरेदीचे व्यवहार केल्याचा संशय आहे

नवी दिल्ली: देशातील काळा पैशाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या 'ऑपरेशन क्लिन मनी'चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. याअंतर्गत, नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार करणाऱ्या 60,000 व्यक्तींची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.

नोटाबंदीनंतरच्या काळात खोटे रोख व्यवहार करणाऱ्या 60,000 व्यक्ती सापडल्या आहेत. यामध्ये 1,300 व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार केले आहेत तर 6,000 लोकांनी मालमत्ता खरेदीचे व्यवहार केल्याचा संशय आहे. याशिवाय, देशातून बाहेर पैसा पाठविण्याच्या 6,600 घटना आढळल्या आहेत. ज्या नोटिसांना प्रतिसाद मिळणार नाही त्यांची सखोल चौकशी होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने(सीबीडीटी) म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या 'ऑपरेशन क्‍लिन मनी' अंतर्गत नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या रकमेबाबत माहिती घेण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात आला होता. याअंतर्गत 9 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारीदरम्यान तब्बल 9,334 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे.