नोटांच्या जलद मोजणीसाठी रिझर्व्ह बॅंकेकडून निविदा

पीटीआय
सोमवार, 24 जुलै 2017

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर जमा झालेल्या पाचशे व हजारच्या रद्द नोटांमधील बनावट नोटा वेगळ्या काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंक १२ ‘करन्सी व्हेरिफिकेशन सिस्टिम’ भाड्याने घेणार आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंकेने निविदा काढली आहे. 

नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या पाचशे व हजारच्या रद्द नोटांची मोजदाद रिझर्व्ह बॅंकेकडून सुरू आहे. मे महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने बनावट नोटा ओळखून वेगळ्या करण्यासाठी १८ ‘करन्सी  व्हेरिफिकेशन सिस्टिम’साठी जागतिक पातळीवर निविदा मागविली होती. नंतर ही प्रक्रिया रद्द करून नव्याने १२ ‘करन्सी व्हेरिफिकेशन सिस्टिम’साठी निविदा मागविण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजदाद रिझर्व्ह बॅंकेच्या प्रादेशिक कार्यालयात सुरू आहे. 

जमा रद्द नोटांची मोजदाद सुरू असल्याने रद्द नोटांची आकडेवारी आताच जाहीर करता येत नाही, असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी १२ जुलैला सांगितले होते. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर २०१६ला नोटाबंदी जाहीर झाली त्या वेळी पाचशेच्या नोटा एक हजार ७१६.५० कोटी व एक हजारच्या नोटा ६८५.८० कोटी चलनात होत्या.