बॅंकांनीच व्याजदर कमी करावेत- ऊर्जित पटेल

पीटीआय
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मुंबई: बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध असल्याने रिझर्व्ह बॅंकेने याआधी केलेल्या रेपोदर कपातीचा फायदा त्यांनी ग्राहकांनी पोचवण्यासाठी व्याजदरात कपात करायला हवी, अशी भूमिका रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी शनिवारी मांडली.

मुंबई: बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध असल्याने रिझर्व्ह बॅंकेने याआधी केलेल्या रेपोदर कपातीचा फायदा त्यांनी ग्राहकांनी पोचवण्यासाठी व्याजदरात कपात करायला हवी, अशी भूमिका रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी शनिवारी मांडली.

ऊर्जित पटेल म्हणाले, ""बॅंकांच्या चालू व बचत खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या आहेत. याचा त्यांना मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात केलेली कपात आणि बॅंकांनी कर्जावरील व्याजात केलेली कपात यात मोठी तफावत आहे. यामुळे बॅंकांना व्याजदर कपात करण्यास खूप वाव आहे. गृह, व्यक्तिगत आदी प्रकारच्या कर्जांवरील एखाद्या बॅंकेचे व्याजदर त्याच बॅंकेचे अन्य कर्जांच्या दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे व्याजदर जास्त असतील अशा क्षेत्रांसाठी तरी बॅंकांनी कपात करायला हवी.''

या आठवड्याच्या सुरवातीला द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने रेपोदर "जैसे थे' ठेवला होता. रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर 6.25 टक्के आणि रिव्हर्स रेपोदर 5.75 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला. जानेवारी 2015 ते सप्टेंबर 2016 या काळात रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात 1.75 टक्के कपात केली आहे.

चलनवाढीकडे लक्ष
चलनवाढीबाबत बोलताना पटेल म्हणाले, ""पतधोरण समितीच्या बैठकीत सप्टेंबरपासून अन्नपदार्थ आणि इंधनाची चलनवाढ कमी झाली नसल्याचा मुद्दा समोर आला. यामुळे चलनवाढ आणखी कमी होण्याची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणातील भूमिका स्वीकारार्हवरून बदलून तटस्थ केली आहे. किरकोळ चलनवाढ 5 टक्‍क्‍यांच्या जवळ स्थिर करण्याचा आमचा उद्देश आहे.'' रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ चलनवाढ 2021 पर्यंत 4 टक्‍क्‍यांवर कायम राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.