खरेदीची पर्वणी जवळ येतेय...

खरेदीची पर्वणी जवळ येतेय...

अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्यापार युद्धाची ठिणगी उडविल्याने जागतिक शेअर बाजारांत मोठी घबराट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेने सध्या चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर कर वाढविला आहे. याला विरोध म्हणून चीनही आता अमेरिकेतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर कर वाढवत आहे. हे लोण अजून किती देशात पसरेल, हे आज जरी समजत नसले, तरी हे वाढणे जगाला परवडणारे नाही. त्यामुळे पुढील प्रत्येक कृती करताना हे देश विचार करतील व टोकाची भूमिका घेणार नाहीत, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. पुढील ३० दिवसांत या व्यापार युद्धाचा शेवट होण्याची शक्‍यता राहील. या दबावाखाली ‘निफ्टी’ जर ९५०० अंशांपर्यंत पोचला, तर खरेदीसाठी पर्वणी असेल. व्यापार युद्धाबरोबर अमेरिकेने वाढविलेले व्याजाचे दर, कच्च्या तेलाचे वाढणारे दर व पुढील काळात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता, याबाबी पुढील काळात बाजारावर दबाव वाढविणाऱ्या असतील.

बाजारात सध्या विक्रीचा दबाव वाढविण्यामागे दीर्घकालीन गुंतवणुकीवरील नफावसुली आणि कर भरण्यासाठी पैशांची गरज असल्याचे कारणही सांगितले जात आहे. परंतु, पुढील आठवड्यात या बाबींचा दबाव बाजारावर नसेल. जागतिक बाजारही स्थिर होण्याची शक्‍यता आहे. तेव्हा तळपातळी पाहून खरेदीचा विचार करण्यापेक्षा आतापासूनच हळूहळू थोडी-थोडी खरेदी करत राहावी. सध्याची भीती कितीही वाढली, तरी ‘निफ्टी’ ९,५०० अंशांखाली जाण्याची शक्‍यता नाही. जेव्हा बाजार वाढण्यास सुरवात करेल तेव्हा आतापर्यंत झालेल्या एकूण घसरणीच्या निम्म्या अंशांइतकी वाढ नक्की होईल.       

तांत्रिक कल कसा राहील?
मागील शुक्रवारी ‘निफ्टी’ १० हजार अंशांच्या पातळीवर बंद झाला असून, सध्याच्या परिस्थितीत ‘निफ्टी’च्या पातळ्या मोठ्या झाल्या आहेत. वरच्या दिशेने १०,१५० अंश व खालच्या बाजूस ९,९०० अंश या महत्त्वाच्या पातळ्या आहेत. १०,१५० अंशांवर ‘निफ्टी’ टिकला, तर १०,२६० अंशांपर्यंत वाढेल. जर, ९,९०० अंशांखाली टिकला, तर पुढे ९,७५० अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता राहील. परंतु, हळूहळू खरेदी करण्याची संधी जवळ येत असून, जर ‘निफ्टी’ ९,५०० अंशांपर्यंत घसरला, तर ही खरेदीची मोठी संधी राहील. थोडक्‍यात, ९,७५० ते ९,५०० अंश ही पातळी खरेदीसाठी पर्वणी असेल.                  
खरेदी करण्यासारखे.....
एचडीएफसी बॅंक (भाव : रु १८४१, उद्दिष्ट ः रु. २३००)
खासगी बॅंकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठी, नामांकित बॅंक आहे. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी या बॅंकेचा शेअर खरेदी करण्यास हरकत नाही. सरकारी व इतर खासगी बॅंकांपेक्षा ही बॅंक गुंतवणुकीसाठी सुरक्षित वाटते. सध्या इतर बॅंकांचे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (एनपीए) अधिक असून, या बॅंकेची मात्र एकूण निव्वळ संपत्तीच्या एक टक्का रक्कम अनुत्पादित कर्जात अडकली आहे. कर्जावर मिळणारा व्याजरूपी महसूल मार्च २०१० पासून दर तिमाही ३ ते ५ टक्के वाढता आहे. मार्च २०१० मध्ये निव्वळ नफा ८३६ कोटी रुपयांवरून आज ४६४२ कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. बॅंकेच्या शेअरची पुस्तकी किंमत आज ३९८ आहे. पी/बीव्ही (४.७) व पी/ई (२८) ही गुणोत्तरे, तसेच निव्वळ नफ्याचे प्रमाण (२१.६४) आणि विकास दर (१.३४) ही परिमाणे उत्तम पातळीवर असल्याचे दिसते. पुढील एका वर्षात यात केलेल्या गुंतवणुकीवर २५ टक्के लाभ मिळण्याची शक्‍यता अधिक आहे.

(डिस्क्‍लेमर ः लेखक शेअर बाजाराचे संशोधन-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com