म्युच्युअल फंडाच्या नव्या योजना पारखून घ्या!

म्युच्युअल फंडाच्या नव्या योजना पारखून घ्या!

शेअर बाजार तेजीत असताना बहुतेक सर्वच शेअरचे बाजारभाव आणि म्युच्युअल फंडाचे बाजारमूल्य (एनएव्ही) त्यांच्या अत्युच्च पातळीच्या आसपास पोचलेले असते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार स्वस्तात (कमी भावात किंवा मूल्यात) मिळणाऱ्या शेअर किंवा म्युच्युअल फंडाच्या शोधात असतात. अशावेळी बाजारात नव्याने दाखल होणारे म्युच्युअल फंड (एनएफओ) गुंतवणूकदारांना स्वस्त वाटतात, कारण त्यांचे मूल्य आता फक्त दहा रुपये असते. बाजारात उपलब्ध असलेले जुने फंड महाग वाटत असल्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत नव्या योजनांकडे आकर्षित होतात. अशा वेळी पुढील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.

१) म्युच्युअल फंडाच्या दर्शनी किमतीला स्वतःचे अस्तित्व नसते. ज्या शेअरमध्ये आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये त्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक असते, त्यांच्यातून होणाऱ्या फायद्यावर सर्व काही अवलंबून असते. म्हणूनच जुन्या म्युच्युअल फंडाची किंमत (मूल्य) अधिक असेल, तर तो ‘महाग झाला आहे,’ असे म्हणून टाळणे योग्य नव्हे. उदाहरणादाखल असे समजू या, की पंधरा वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या एका म्युच्युअल फंडाची आजची किंमत ३०० रुपये आहे. दुसऱ्या बाजूला नवीन आलेल्या फंडाची किंमत दहा रुपये आहे. या दोन्ही फंडांची गुंतवणूक समान कंपन्यांच्या शेअरमध्ये आहे असे मानले, तर त्या दोन्हींपासून होणारा फायदा किंवा तोटा एकसारखाच असेल. म्हणजे पाच वर्षांनंतर गुंतविलेल्या शेअरचे भाव दुप्पट झाले असे मानले, तर जुन्या फंडाची किंमत ६०० रुपये होईल, तर नवीन फंडाची किंमत २० रुपये होईल. या ठिकाणी फंडाचे खर्च विचारात घेतलेले नाहीत. ते जर विचारात घेतले तर कमी खर्च असलेला फंड अधिक फायदेशीर ठरेल हे सहज लक्षात येते.

२) थोडक्‍यात, फंडाची गुंतवणूक संकल्पना काय आहे, त्याच्याकडे किती मालमत्ता आहे आणि त्या फंडाचे खर्च किती आहेत, या गोष्टीही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या आहेत. या तीनही निकषांवर जुने फंड सरस ठरताना दिसतात. फंडाची ‘एनएव्ही’ किती आहे, हा निवडीचा निकष होऊ शकत नसल्यामुळे ‘एनएव्ही’ला अवास्तव महत्त्व देण्याचे टाळावे.

३) याशिवाय नव्या म्युच्युअल फंडाच्या खरेदीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे युनिट्‌स मिळतातच. नव्या शेअरच्या ‘आयपीओ लिस्टिंग’च्यावेळी अधिक मागणी व मर्यादित पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार संबंधित शेअरचे भाव एकाच दिवसात वर जाऊ शकतात. त्याप्रमाणे नव्या म्युच्यअल फंडाची किंमत चटकन वाढत नाही. 

४) नव्या फंडाचा अभ्यास करताना (जुन्या फंडांप्रमाणे) त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा अभ्यास देखील करता येत नाही; तसेच त्यांचे मानांकन देखील झालेले नसते. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला त्या फंडाचा सखोल अभ्यास करणे अवघड जाते.

५) कमी किमतीत मिळणारे नवे फंड एका मुद्द्यावर मात्र सरस ठरू शकतात. अशा फंडाने जर लाभांश दिला, तर त्याचा ‘यील्ड’ उत्तम मिळतो. कारण जुन्या फंडांच्या बाबतीत असा लाभांश दर्शनी मूल्यावर (दहा रुपये) मिळत असल्याने ‘यील्ड’ खूप कमी मिळतो. अर्थात, नव्या फंडाकडून लगेच लाभांशाची अपेक्षा करणे देखील चुकीचे असते. त्यामुळे या ठिकाणी देखील गुंतवणूकदारांची निराशा होऊ शकते.  

नव्या फंडाने जर आतापर्यंत अमलात न आणलेली एखादी नावीन्यपूर्ण गुंतवणूक संकल्पना समोर आणली असेल, तर ती पारखून घ्यायला हवी आणि मगच अशा फंडाचा आपल्या भात्यात समावेश करायचा का नाही हे ठरवावे; अन्यथा ‘जुने ते सोने’ हे लक्षात ठेवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com