सीडीएसएलच्या शेअरची उद्या नोंदणी

CDSL shares get registered tomorrow
CDSL shares get registered tomorrow

मुंबई: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या (सीडीएसएल) शेअरची उद्या (शुक्रवार) शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. सीडीएसएलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला.

सीडीएसएलने या इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा रु. 145 ते रु. 149 असा ठेवला होता. त्यामुळे आता शेअर बाजारात किती रुपयांवर शेअरची नोंदणी होते याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, शेअरची 225-250 रुपयांवर नोंदणी होण्याची शक्यता आहे.

कंपनीने 524 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्याबदल्यात कंपनीला 31,000 कोटींच्या बोली प्राप्त झाल्या होत्या. म्हणजेच प्रस्तावित योजनेत, कंपनीने 2.48 कोटी शेअर्सची विक्री करण्याचे ठरविले होते. मात्र कंपनीकडे 209 कोटी शेअर्सच्या खरेदीसाठी अर्ज करण्यात आले.

सीडीएसएल ही बीएसई लिमिटेडची उपकंपनी असून, सिक्‍युरिटीज डिपॉझिटरी म्हणून काम करते. डीमॅट अकाउंट उघडणे, अकाउंट स्टेटमेंट, प्लेजिंग, सिक्‍युरिटीजचे ट्रान्समिशन, नॉमिनेशन, पत्ता बदलणे, बॅंक खाते तपशील आणि डिपॉझिटरी सहभागींसाठी एसएमएस सेवा यासारख्या विविध सेवा ही कंपनी प्रदान करते. अलीकडील काळात भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांसाठी व मध्यस्थांसाठी केवायसी सेवा आणि विविध विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसीधारकांना इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात विमा पॉलिसी घेण्याची सुविधा; तसेच ई-व्होटिंग, ई-लॉकर आणि इच्छापत्र (विल) तयार करण्यासारख्या इतर ऑनलाइन सेवा पुरविते. या विविध सेवा सीडीएसएल व्हेंचर्स, सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉझिटरी, सीडीएसएल कमोडिटी रिपॉझिटरी या उपकंपन्यांमार्फत पुरविल्या जातात. मागील तीन वर्षांमध्ये कंपनीचे उत्पन्न रु. 145 कोटींपासून रु. 187 कोटी, तर निव्वळ नफा रु. 57 कोटींपासून रु. 86 कोटी इतका वाढला आहे. कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त असून, 31 मार्च 2017 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण नेटवर्थ रु. 533 कोटी होती. त्यानुसार पुस्तकी मूल्य रु. 51 प्रति शेअर आहे. ताळेबंदात रोख आणि समतुल्य गुंतवणूक रु. 548 कोटी आहे.

आजघडीला आपल्या देशात दोनच डिपॉझिटरी काम करतात. त्यामुळे एकूणच स्पर्धा कमी आहे. तसेच, आगामी काळात म्युच्युअल फंड, विमा आदी इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात येत आहेत. तसेच, एकूण डीमॅटबद्दल सजगता वाढत जाईल. त्यामुळे कंपनीला भवितव्य चांगलेच राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com