ग्राहक संरक्षण विधेयक अधिवेशनात होणार मंजूर

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर चालू अधिवेशनात तो मंजूर करुन घेण्याचा सरकारचा मानस आहे, असे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितले. 

 नवी दिल्ली : ग्राहकहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या 'ग्राहक संरक्षण विधेयका'चा सुधारित मसुदा तयार झाला असून, संसदेच्या चालू अधिवेशनात तो मंजूर करुन घेण्याचा सरकारचा मानस आहे. ग्राहक मंत्रालयाने संसदीय स्थायी समितीच्या शिफारसी विचारात घेऊन मूळ मसुद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. 

ग्राहक संरक्षण कायद्याच्या नव्या मसुद्यात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या सेलिब्रिटींना मोठा दंड आकारण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, अमेरिका आणि युरोपच्या धर्तीवर ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी ग्राहक संरक्षण प्राधिकरण यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवाय, एखाद्या अन्नपदार्थापासून ग्राहकाला विषबाधा झाल्यास ते उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीला दंड करण्याचीदेखील तरतूद आहे. 
 
मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर चालू अधिवेशनात तो मंजूर करुन घेण्याचा सरकारचा मानस आहे, असे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितले. 

तीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला ग्राहक संरक्षण कायदा रद्द करण्यासाठी सरकारने मागील वर्षी (2015) ऑगस्ट महिन्यात लोकसभेत ग्राहक संरक्षण विधेयक सादर केले होते. संसदीय स्थायी समितीने त्यानंतर एप्रिल महिन्यात बदल सूचविले होते. यापैकी काही शिफारसींना मंजुरी देत नव्याने तयार करण्यात आलेल्या मसुद्याची जेष्ठ मंत्र्यांकडून चिकित्सा झाली आहे, असेही पासवान यांनी सांगितले आहे.    

Web Title: consumer protection bill to be passed in parliament