ई-कॉमर्स- दिवाळीत होईल 1700 कोटींची उलाढाल

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

दिवाळी खरेदी हंगामाचा फायदा करून घेण्यासाठी सर्वच कंपन्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. या दिवाळीला सर्व भारतीय एकत्रितपणे सुमारे 1700 कोटी डॉलरची खरेदी करतील असा अंदाज रेडसिअर कन्सल्टिंग संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी केवळ काही उच्चभ्रू लोकांपुरत्या मर्यादित असलेल्या ई-कॉमर्स क्षेत्राचा झपाट्याने विस्तार आहे. परिणामी, या क्षेत्रातील कंपन्यांमधील स्पर्धादेखील त्याच वेगाने तीव्र होत आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भरघोस सवलत योजनांना सुरुवात झाली आहे. 

दिवाळी खरेदी हंगामाचा फायदा करून घेण्यासाठी सर्वच कंपन्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. या दिवाळीला सर्व भारतीय एकत्रितपणे सुमारे 1700 कोटी डॉलरची खरेदी करतील असा अंदाज रेडसिअर कन्सल्टिंग संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. वृत्तपत्रे, फलक, सोशल मीडिया आणि टीव्ही शोसारख्या सर्वच माध्यमांमधून कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर जाहीराती केल्या जात आहेत. 

चीनमध्ये पाय रोवण्यात अपयश आल्यानंतर अमेरिकन कंपनी ऍमेझॉनने भारतावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या कंपनीच्या ऑनलाईन मंचावर 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त व्यापारी उपलब्ध आहेत. शिवाय, कंपनीकडे दोन डझनपेक्षा जास्त गोदामे आहेत. भारतातील पहिल्या क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी होण्याचे ऍमेझॉनचे उद्दिष्ट आहे. कंपनीने जून महिन्यात देशात अतिरिक्त तीनशे कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. कंपनीने यापूर्वीदेखील दोनशे कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती. 

परदेशी कंपन्यांसमोर भारतातील प्रादेशिक विविधतेचे आव्हान आहे. प्रत्येक भागातील लोकांची भाषा, त्यांच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळेच, युनिलिव्हर आणि प्रॉक्‍टर अँड गॅम्बलसारख्या कंपन्यांना दशकभराचा स्ट्रगल करावा लागला आहे. याशिवाय, पुरवठा साखळीतील त्रुटी, स्थावर मालमत्तांच्या किंमती, कुशल मनुष्यबळाचा अभाव, तसेच कमकुवत पायाभूत सुविधा आणि कठोर नियमावलीसारखी अनेक आव्हाने या कंपन्यांसमोर आहेत. 

येत्या 2020 पर्यंत वार्षिक ऑनलाईन विक्रीचा आकडा 80 अब्ज डॉलरवर जाईल, असाही अंदाज रेडसिअरने व्यक्त केला आहे. सध्या ही उलाढाल 13 अब्ज डॉलरएवढी आहे. येत्या 2025 पर्यंत ऍमेझॉनच्या मंचावरुन एकुण 81 अब्ज डॉलरच्या उत्पादनांची विक्री होईल, असा अंदाज मेरिल लिंचने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी कंपनीमार्फत सुमारे 3.7 अब्ज डॉलरची विक्री करण्यात आली होती. 

याशिवाय, मेट्रो शहरांशिवाय इतर शहरांमध्ये विस्तार करण्याचे मोठे आव्हान ई-कॉमर्स कंपन्यांसमोर आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसाठीदेखील ही दिवाळी निर्णायक ठरणार आहे. गेल्या दिवाळीत भरभरुन जाहीराती करणाऱ्या अनेक लहान कंपन्या यावर्षी बंद पडल्या. 

ऍमेझॉनची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या फ्लिपकार्टने आपली हिस्सेदारी वॉलमार्टला विकण्यासाठी बोलणी सुरु केली आहे. याशिवाय, शेवटच्या टप्प्यातील लॉजिस्टिक्‍स सेवांसाठी कंपनीतर्फे 10,000 तात्पुरत्या नोकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऍमेझॉनदेखील उत्पादनांचा साठा(इन्व्हेंटरी) वाढविण्यासाठी झपाट्याने नव्या विक्रेत्यांची भरती करुन घेत आहे. यासाठी कंपनीने ‘व्हाइट-अँड-ऑरेंज चाय कार्टस विथ एमसरीज्‌‘ आणि ‘फीट-ऑन स्ट्रीट‘ सारखे उपक्रम राबविले आहेत. याअंतर्गत कंपनी विविध विक्रेत्यांपर्यंत स्वतः जाऊन त्यांना आपल्यासोबत जोडून घेत आहे. 

स्नॅपडीलनेदेखील आपली प्रतिमा बदलण्यासाठी(रिब्रॅंडिंग) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करीत आपला नवा लोगो सादर केला आहे. कंपनीने आपला लाल व निळ्या रंगाचा लोगो मागे टाकत आता केवळ लाल रंगाच्या बॉक्‍सचा नवा लोगो धारण केला आहे. स्नॅपडील आता पुढच्या टप्प्यातील वाढीवर लक्ष केंद्रीत करुन पाहत आहे. कंपनीचे आणखी 10 कोटी ऑनलाईन खरेदीदारांशी जोडले जाण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.