राज्यातील बचत गटांना जागतिक बाजारपेठ

mahila bachat gat
mahila bachat gat

मुंबई : सिंगल ब्रॅंड रिटेलमधली स्वीडिश कंपनी "आयकिया'तर्फे महाराष्ट्रातील पहिले स्टोअर नवी मुंबईतील खारघरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

सध्या कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील बचत गटांची उत्पादने विकत घेणाऱ्या "आयकिया'ने आता महाराष्ट्रातील बचत गटांवर लक्ष केंद्रित केले असून हस्तकला, वस्त्रोद्योगातील वस्तूंची "आयकिया' जगभरातील स्टोअर्समध्ये विक्री करणार आहे. या प्रक्रियेत महिला बचत गटांना कंपनी प्रशिक्षित करणार असून त्यांना आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे. 
तीन वर्षांपासून "आयकिया'ने देशभरातील बचत गटांचा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्रातील महिला स्वयंसहायता आणि बचत गटांबाबत कंपनी खूपच आशावादी असल्याचे आयकिया सोशल आत्रप्य्रुनिअर विभागाच्या प्रमुख वैशाली मिश्रा यांनी सांगितले. हस्तकला, वस्त्रोद्योगातील विविध वस्तूंबरोबरच भारतीय खाद्यपदार्थांबाबत "आयकिया'ने व्यावसायिक योजना तयार केली असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. सध्या रंगसूत्र, इंडस्ट्री या दोन संस्थांकडून महिलांची विविध उत्पादने खरेदी केली जातात. साधारणत: 2200 महिलांनी तयार केलेली उत्पादनांची जगभरातील 150 हून अधिक स्टोअर्समध्ये विक्री होत आहे. महाराष्ट्रातील बचत गटांकडे प्रचंड क्षमता आहे. कलाकुसर आणि वैविध्यतेमुळे ही उत्पादने जागतिक बाजारात लोकप्रिय होतील, असा विश्‍वास मिश्रा यांनी व्यक्त केला. 

आयकियाच्या उत्पादनांचा दर्जा कायम राखण्यासाठी महिलांना कंपनी प्रशिक्षण देईल. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून महिला बचत गटांची माहितीचा अभ्यास केला जात असून यातून लवकरच अंतिम निवड केली जाईल, अशी माहिती मिश्रा यांनी दिली 

खरेदी दुपटीने वाढवणार 
"आयकिया'चे भारतातील पहिले मेगा स्टोअर हैदराबादमध्ये या वर्षाअखेर सुरू होणार आहे. दुसरे स्टोअर खारघरमध्ये सुरू होणार असून या महिन्यात या स्टोअर्सचे भूमिपूजन होईल. भारतात प्रत्यक्षात स्टोअर्स सुरू झाल्यानंतर स्थानिक कंपन्यांकडील मालाची खरेदी दुप्पट केली जाईल, असे आयकिया इंडियाचे व्यवसाय विकासप्रमुख संदीप सानन यांनी सांगितले. सध्या आयकियाकडून 300 दशलक्ष युरोचा माल खरेदी केला जातो. 2020 पर्यंत उलाढाल दुपटीने म्हणजेच 600 दशलक्ष युरोपर्यंत वाढवण्यात येईल. ज्यामुळे जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती होईल, असा विश्‍वास सानन यांनी व्यक्त केला. होम फर्निशिंगची बाजारपेठेत प्रचंड संधी असून त्या दृष्टीने टिकाऊ आणि किफायतशीर फर्निचरच्या निर्मितीवर आयकियाचे प्राधान्य राहील, असे सानन यांनी सांगितले. खारघरमधील स्टोअर्स पुढील वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. पुण्यात कंपनीकडून वितरण केंद्र सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com