आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांना 11,353 कोटी रुपयांचा फटका

पीटीआय
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँकेचा शेअर इंट्राडे व्यवहारात 7 टक्क्यांनी कोसळला. शेअरने आज (सोमवार) इंट्राडे व्यवहारात 7 टक्के घसरणीसह 258.90 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. शेअर घसरल्याने आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांना 11,353 कोटी रुपयांचा फटका बसला

मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर व्हिडिओकॉनला कर्ज देण्याच्या गैरव्यवहार सामील असल्याचे आरोप होत आहेत. शिवाय व्हिडिओकॉनला कर्ज देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सीबीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आयसीआयसीआय बॅंकेच्या इतर काही अधिकाऱ्यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँकेचा शेअर इंट्राडे व्यवहारात 7 टक्क्यांनी कोसळला. शेअरने आज (सोमवार) इंट्राडे व्यवहारात 7 टक्के घसरणीसह 258.90 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. शेअर घसरल्याने आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांना 11,353 कोटी रुपयांचा फटका बसला. 

दिवाळखोरीच्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी तसेच अन्य नियमित बाबींची पूर्तता करण्यासाठी आज संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन प्रकरणानंतर बँकेच्या संचालक मंडळाची प्रथमच बैठक होत आहे. मात्र ही बँकेकडून आयोजित करण्यात आलेली नेहमीसारखी बैठक असल्याचे  आयसीआयसीआय बँकेकडून सांगण्यात आले 

समूहाला कर्ज मंजूर करताना आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतल्याचा आरोप एका वृत्तसंस्थेने केल्याने बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र बँकेने कोचर यांना पाठिंबा देत दिलासा दिला. 'व्हिडिओकॉन ऑफ लेंडर्स'ला सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये चंदा कोचर यांचा देखील सहभाग होता. मात्र चंदा कोचर यांचीच फक्त जबाबदारी नसून संपूर्ण बॅंकेची जबाबदारी असल्याची बॅंकेने भूमिका घेतली होती. 

काय आहे प्रकरण: 
व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती. शिवाय बँकेकडून 'व्हिडिओकॉन ऑफ लेंडर्स'ला सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर फक्त 9 लाख रुपयात ती कंपनी दीपक कोचर यांना विकण्यात आली. 

सध्या मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँकेचा शेअर 5.66 टक्क्यांच्या म्हणजेच 15.75 रुपयांच्या घसरणीसहा 262.65 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 168,408.44 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 
 

Web Title: ICICI Bank stock slumps 7%; mcap drops Rs 11,353 cr