'होंडा'साठी भारत सर्वांत मोठे उत्पादन केंद्र

शनिवार, 5 ऑगस्ट 2017

सुमारे 70 हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेला हा प्रकल्प होंडा मोटारच्या "मेक इन इंडिया' कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे. "होंडा'ने या प्रकल्पात नव्याने 606 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, 1555 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

नारसापुरा (बंगळूर) : "होंडा'च्या दुचाकींची जोडणी करणाऱ्या चौथ्या नव्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्‌घाटन बंगळूरजवळील नारसापुरा येथे नुकतेच करण्यात आले. यामुळे आता जागतिक स्तरावर "होंडा'साठी दुचाकींची निर्मिती करणारा भारत हा सर्वांत मोठे उत्पादन केंद्र बनला आहे.

या नव्या जोडणी प्रकल्पात वर्षाला सहा लाख दुचाकी बनविता येणार आहेत. याबरोबरच उत्पादन क्षमता 24 लाख दुचाकींपर्यंत वाढविली जाणार आहे. भारतासारख्या गतिशील बाजारपेठेची वाढती मागणी आणि भविष्यातील संधींची पूर्तता करण्यासाठी चौथा जोडणी प्रकल्प आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवाय जागतिक पातळीवर नारसापुरा प्रकल्प हा "होंडा'साठी सर्वांत मोठा प्रकल्प बनला आहे. "होंडा'च्या भारतातील 18 वर्षांपासूनच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे मुख्य अधिकारी (आशिया आणि ओशिनिया) शिंजी आयोयामा यांनी सांगितले.

"होंडाच्या नारसापुरा (कर्नाटक), मानेसर (हरियाना), तापुकारा (राजस्थान) आणि विठ्ठलपूर (गुजरात) येथील चारही प्रकल्पांत 64 लाख मोटारसायकल आणि स्कूटरचे उत्पादन केले जाते. दरवर्षी 58 लाख दुचाकींची निर्मिती करणाऱ्या इंडोनेशियाला मागे टाकले गेले आहे. आता भारत सर्वांत मोठे केंद्र बनला आहे,'' असे होंडा इंडियाचे अध्यक्ष मिनोरू काटू यांनी नमूद केले. भारतात दुचाकी उद्योग 9 टक्के वाढतो आहे; मात्र होंडाने 19 टक्के दर गाठला आहे, असेही ते म्हणाले.

सुमारे 70 हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेला हा प्रकल्प होंडा मोटारच्या "मेक इन इंडिया' कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे. "होंडा'ने या प्रकल्पात नव्याने 606 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, 1555 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.