मिस्त्रींच्या कारकीर्दीत एलआयसीची टाटांच्या शेअर्सला कात्री!

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

शेअर बाजारात सादर झालेल्या शेअरहोल्डिंग माहितीनुसार, डिसेंबर 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तेव्हापासून एलआयसीची टाटा समुहातील अनेक प्रमुख कंपन्यांमधील हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.

नवी दिल्ली: सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा समुहाचे अध्यक्षपद आल्यापासून भारतीय आयुर्विमा मंडळाने(एलआयसी) समुहाच्या विविध कंपन्यांमधील हिस्सेदारीत लक्षणीय घट केल्याचे एका इंग्रजी दैनिकाने केलेल्या विश्लेषणात समोर आले आहे.

शेअर बाजारात सादर झालेल्या शेअरहोल्डिंग माहितीनुसार, डिसेंबर 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तेव्हापासून एलआयसीची टाटा समुहातील अनेक प्रमुख कंपन्यांमधील हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. विशेषतः, टाटा एलक्सी(5.26%), टाटा कम्युनिकेशन्स(4.12%) आणि इंडियन हॉटेल्स (4.01%) या तीन प्रमुख कंपन्यांमधील हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे.

या विक्रीमागे कोणताही विशेष हेतू नसून कंपनीचे दीर्घकालीन गुंतवणूक धोरण आणि त्यावेळची बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन हे व्यवहार करण्यात आले, असे स्पष्टीकरण एलआयसीच्या एका फंड व्यवस्थापकाकडून देण्यात आले आहे. एलआयसीकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

या कालावधीत टाटा ग्लोबल बेव्हरेजेस(2.49%), टाटा मोटर्स(0.22%), टाटा पॉवर(0.14%) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील(0.02%) हिस्सेदारीत किरकोळ वाढ झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय आयुर्विमा मंडळाकडे टाटा समुहाच्या विविध नोंदणीकृत कंपन्यांमध्ये रु.30,000 कोटींचे शेअर्स आहेत.

Web Title: LIC trimmed stake in Tata Group cos with Cyrus Mistry at helm