निफ्टी पहिल्यांदाच 9950 अंशांवर बंद 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

आज मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेल, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, इंडियाबुल्स हाउसिंग आणि टीसीएस यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते, तर डॉ रेड्डीज, वेदांत, ऍक्‍सिस बॅंक, सन फार्मा, टाटा स्टील, ओएनजीसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. 

मुंबई : शेअर बाजारात आज दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सकाळच्या सत्रात दोन्ही मुख्य निर्देशांकांनी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेनसेक्‍स 217 अंशांनी वधारून 32,245.87 पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 51 अंशांनी वधारून 9,966.4 पातळीवर बंद झाला.

निफ्टीने आज इंट्राडे व्यवहारात 9,982.05 अंशांची, तर सेन्सेक्‍सने 32,320.86 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील खरेदीचा उत्साह होता. क्षेत्रीय पातळीवर बॅंकिंग, एफएमसीजी, आयटी आणि कंझ्युमर्स ड्युरेबल्स कंपन्यांचे शेअर्स आज सर्वाधिक वधारले होते. एफएमसीजी निर्देशांक 1 टक्के, आयटी निर्देशांक 1 टक्के आणि पीएसयू बॅंक निर्देशांकात 1.5 टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली, तर कंझ्युमर्स ड्युरेबल्स निर्देशांकात 0.3 टक्‍क्‍याची किरकोळ वाढ झाली. याउलट आज मीडिया, मेटल आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा सुरू होता. 