शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’

शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’

मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50 अंशांची घट झाली आणि तो 9 हजार 964.40 अंशांवर स्थिरावला. या पडझडीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी कमी झाल्याचा अंदाज दलालांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी करताना अर्थ व्यवस्थेची वाढ खुंटली आहे. चालू वर्षात विकासावर परिणाम होण्याची शक्‍यता विविध संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरकारची धोरणे आणि अर्थव्यवस्थेची वाढ यावर पत मानांकन संस्थांची करडी नजर आहे. स्टॅंडर्ड अँड पुअर्स या संस्थेने चीनचे मानांकन कमी केल्यानंतर हॉंगकॉंगच्या पत मानांकनात कपात केली आहे. या घडामोडीनंतर भारताच्या पत मानांकनावर दबाव निर्माण झाला आहे. त्यातच अमेरिका आणि उत्तर कोरियातील संघर्ष चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली असून याचा परिणाम परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांवर झाला.

गेल्या काही सत्रांपासून गुंतवणूक कमी करणाऱ्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी चौफेर विक्री करत गुंतवणूक भार कमी केला. याचा फटका धातू, ऑटो, बांधकाम, पीएसयू, बॅंका आणि वित्त संस्था, एफएमसीजी, मीडिया, या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली.

मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, आयटीसी, डॉ. रेड्डी लॅब, कोटक बॅंक, एसबीआय, एचडीएफसी बॅंक, कोल इंडिया, भारती एअरटेल, रिलायन्स, ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, एचयूएल, ऍक्‍सिस, इन्फोसिस, टीसीएस आदी शेअर घसरणीसह बंद झाले. एलअँडटी इन्फोटेक, भारती इन्फ्राटेल, राजेश एक्‍सपोर्ट, एचसीएल टेक्‍नॉलॉजी आदी शेअर वधारले.

निफ्टीने तोडली 10 हजार अंशांची पातळी 
राष्ट्रीय शेअर बाजारातील चौफेर विक्रीने निफ्टीने 10 हजार अंशांची पातळी तोडली. तो 157.50 अंशांच्या घसरणीसह 9 हजार 964 अंशावर बंद झाला. विक्रीचा इतका प्रचंड मारा होता की निफ्टी मंचावरील 50 पैकी 47 शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यात हिंदाल्को, येस बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, वेदांता, टाटा स्टील यामध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. जागतिक अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढण्याला प्राधान्य दिल्याचे बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ फंड व्यवस्थापक कार्तिकराज लक्ष्मण यांनी सांगितले.

रुपया होरपळला 
परकीय गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावल्यानंतर चलन बाजारात डॉलरची मागणी वाढली. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली दमछाक झाली. डॉलरच्या तुलनेत तो 65.16 या नीचांकावर गेला होता. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपामुळे तो सावरला.

शेअरमधील पडझडीची कारणे 

  • अमेरिका आणि उत्तर कोरियातील संघर्ष
  • स्डॅंडड अँड पुअर्स या पतमानांकन संस्थेकडून चीनच्या मानांकनात कपात
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्‍यता
  • नोटाबंदी आणि जीएसटीचा विकासावर परिणाम, विकासदर खुंटण्याचे "ओईसीडी" या संस्थेचे भाकीत
  • परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून नफावसुली करत पैसे काढण्याचा सपाटा
  • चलन बाजारात रुपयाची दमछाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com