लाखोंच्या गुंतवणुकीच्या संधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई: चालू महिन्यात शेअर बाजारात पाच कंपन्या आपले आयपीओ बाजारात आणणार आहे. जगातील विविध शेअर बाजारांमध्ये सध्या कमालीचे निराशेचे वातावरण असले तरी भारतीय प्राथमिक बाजारात मात्र प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) रेलचेल आहे. भारतीय गुंतवणूकदारांकडून मात्र आयपीओला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई: चालू महिन्यात शेअर बाजारात पाच कंपन्या आपले आयपीओ बाजारात आणणार आहे. जगातील विविध शेअर बाजारांमध्ये सध्या कमालीचे निराशेचे वातावरण असले तरी भारतीय प्राथमिक बाजारात मात्र प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) रेलचेल आहे. भारतीय गुंतवणूकदारांकडून मात्र आयपीओला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेअर बाजारात नुकताच हुडकोचा (बीएसई) आयपीओ येऊन गेला. त्याला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याआधी मार्चमध्ये शेअर बाजारात डी-मार्टचा आयपीओ दाखल झाला होता. त्याला देखील गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता.
चालू महिन्यात कंपन्या शेअर बाजारातून सुमारे 5500 कोटींचे भांडवल उभारणार आहे.

पाच कंपन्यांपैकी एका कंपनीच्या भागविक्रीला आधीच सुरूवात झाली आहे. दूरसंचार उपकरण निर्माती कंपनी तेजस नेटवर्क्‍स लिचा आयपीओ कालपासून खुला झाला आहे.

तेजस नेटवर्क्‍स:

दूरसंचार उपकरणांची निर्मिती करणाऱ्या तेजस नेटवर्क्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीला कालपासून (ता. 14) सुरुवात झाली आहे. उद्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रतिशेअर 250 ते 257 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

प्रस्तावित योजनेत कंपनी सुमारे 450 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, विद्यमान भागधारकांच्या 1.27 कोटी शेअर्सची विक्री करण्यासाठी 'ऑफर फॉर सेल' होईल. गुंतवणूकदारांना कमीत कमी 55 शेअर्स खरेदी करावे लागतील. अधिक शेअर्स खरेदी करावयाचे असल्यास तो आकडा 55 च्या पटीत असायला हवा.
सीडीएसएल:

देशात रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा देणाऱ्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसचा (सीडीएसएल) आयपीओ 19 जून रोजी खुला होणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 21 जूनपर्यंत सीडीएसएलच्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी रु.145-149 किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे.

प्राथमिक समभाग विक्री योजनेअंतर्गत कंपनी एकुण 3.52 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. यापैकी 7 लाख शेअर्स कर्मचार्यांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मुंबई शेअर बाजार (बीएसई), स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय), बँक ऑफ बडोदा आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आपल्या मालकीच्या 3.45 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. ऊर्वरित सात लाख शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे, अशी माहिती कंपनीने सादर केलेल्या डीआरएचपीमध्ये देण्यात आली होती. सीडीएसएलच्या शेअर्सची राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे.

सीडीएसल आणि एनएसडीएल या सध्या देशातील दोन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रोख्यांच्या भांडार असलेल्या संस्था आहेत. सीडीएसएलच्या डिमॅट खातेधारकांची संख्येने 2016 अखेर एक कोटी 60 लाखांचा टप्पा ओलांडला होता.

एरिस लाइफ सायन्सेस:

एरिस लाइफसायन्सेस या फार्मा कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) येत्या 16 जून रोजी सुरुवात होत आहे. कंपनीने शेअरविक्रीसाठी प्रतिशेअर 600 ते 603 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. आयपीओ अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून आहे.

प्रस्तावित योजनेत कंपनी सुमारे 28,875,000 शेअर्सची 'ऑफर फॉर सेल'द्वारे विक्री करणार आहे. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य एक रुपया आहे. या हिस्साविक्रीतून कंपनीला कोणतेही भांडवल मिळणार नाही. हिस्सेदारी विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांना हा निधी जाणार आहे.

जीपीटीएल हॅथवे

'हॅथवे केबल अँड डेटाकॉम'ची उपकंपनी 'जीटीपीएल हॅथवे'च्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) 21 जून रोजी सुरुवात होत आहे. यापुढे 23 जूनपर्यंत चालणाऱ्या विक्रीसाठी कंपनीने प्रतिशेअर 167 ते 170 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

प्रस्तावित योजनेत, कंपनी 240 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, 'ऑफर फॉर सेल'द्वारे 1.44 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यापैकी जीटीपीएल हॅथवेची पालक कंपनी हॅथवे केबल अँड डेटाकॉम 72 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. हॅथवेकडे कंपनीच्या 50 टक्के अर्थात 4.92 कोटी शेअर्सची मालकी आहे. आयपीओतून मिळालेल्या भांडवलाचा उपयोग प्रामुख्याने कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे.

जीटीपीएल हॅथवेकडून पुणे, अहमदाबाद आणि कोलकातासह आणखी अनेक शहरांमध्ये केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड सेवा पुरविल्या जातात. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात(2015-16) 852.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून 69 कोटी रुपयांचा नफा झाला होता.