"इन्फोसिस'मधून सिक्का बाहेर 

"इन्फोसिस'मधून सिक्का बाहेर 

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या "इन्फोसिस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी डॉ. विशाल सिक्‍का यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. गेल्या वर्षभरापासून बिनबुडाच्या आरोपांनी सातत्याने लक्ष्य करणाऱ्या "इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांनाच सिक्का यांनी जबाबदार धरले आहे. "इन्फोसिस'ला सावरण्यासाठी कंपनीचे संस्थापक नंदन निलेकणी यांना पुन्हा संचालक मंडळावर घेण्याचा मूर्ती यांचा कल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, शुक्रवारी (ता.18) इन्फोसिस संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. कंपनीने सिक्का यांच्या जागी यू. बी. प्रवीण राव यांची हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केली आहे. प्रस्तावित शेअर फेरखरेदी योजनेवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या घडामोडींनंतर "इन्फोसिस'मध्ये संचालक मंडळ आणि नारायण मूर्ती असे दोन तट पडले आहेत. 

मुक्तपणे काम करू दिले नसल्याचे सांगत सिक्का यांनी मूर्ती यांना जबाबदार धरले आहे. सिक्का मुख्य कार्यकारीऐवजी तंत्रज्ञान अधिकारी म्हणून वावरतात, असे सांगत काही स्वतंत्र संचालकांनी मूर्ती यांच्याकडे सिक्का यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवरही मूर्ती नाखूष होते. त्यामुळे सिक्कांची घुसमट वाढल्याचे बोलले जात आहे. 

"इन्फोसिस'मध्ये आल्यानंतर सिक्का यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासह 25 नव्या सेवा सुरू केल्या. कंपनीच्या महसुलात गेल्या तिमाहीत 8.3 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. सिक्का यांच्या मार्गदर्शनात कंपनीने बदल अंगीकारत नव्या व्यवसायात जम बसवला. त्यांच्या कारकिर्दीत सर्वोत्तम सेवा देण्यास ते कटिबद्ध होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे एक चांगला सीईओ गमावला असल्याची भावना संचालक मंडळाचे अध्यक्ष आर. शेषशाही यांनी व्यक्त केली. मूर्ती यांनी पाठवलेल्या ताज्या मेलमध्येही सिक्का यांच्यावर हल्ला केल्याचे संचालक मंडळाने म्हटले आहे. सिक्का यांच्याकडे तात्पुरता कार्यकारी उपाध्यक्षपदाचा भार सोपवण्यात आला आहे. 

तीन वर्षांपूर्वी रोवलेल्या नावीन्यतेच्या बीजांमधून मधुर फळांची चव कंपनीने घेतली. मात्र बिनबुडाचे आरोप करून मला लक्ष्य करण्यात आले. स्वतंत्रपणे चौकशी झाली, मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही. तरीही आपल्यावरील आरोप सुरूच राहिल्याने कंपनीची धुरा सांभाळणे शक्‍य नाही. 
- विशाल सिक्का, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी 

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी 
राजीनामा देताना विशाल सिक्का यांनी थेट कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे बोट दाखविले आहे. दिवसभर सिक्का आणि मूर्ती यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहिल्या. योग्यवेळी आपली बाजू मांडू, असे सिक्का आणि मूर्ती यांनी म्हटले आहे. पनाया कंपनीच्या अधिग्रहणामध्ये काही संचालकांना बक्कळ फायदा मिळाल्याच्या संशयाने मूर्ती यांनी व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केली होती. त्यानंतर ते सातत्याने यासंबंधीचा चौकशी अहवाल जाहीर करण्यासाठी आग्रही होते. मूर्ती आणि सिक्का यांच्यात तेव्हापासून दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते. 

नारायण मूर्ती व्यथित 
सिक्का यांच्या आरोपांनी मूर्ती व्यथित झाले आहेत. 2014 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपण कधीच आपल्या मुलांकरिता कोणते पद मागितले नाही. कंपनीमध्ये पारदर्शकता आणि योग्य कार्यपद्धती असावी, इतकाच आपला आग्रह होता. वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या तक्रारींनंतर मी वेळोवेळी संचालक मंडळाच्या निदर्शनास ही बाब आणली. योग्यवेळी बाजू मांडू, असे मूर्ती यांनी चारपानी पत्रात म्हटले आहे. 

तीस हजार कोटींना फटका 
विशाल सिक्का यांच्या राजीनाम्याचे पडसाद "इन्फोसिस'च्या शेअरवर उमटले. शुक्रवारी शेअर बाजारात "इन्फोसिस'च्या शेअरने दिवसभरात 13 टक्‍क्‍यांपर्यंत गटांगळी खाल्ली. दिवसअखेर तो 9.57 टक्‍क्‍यांच्या घसरणीसह 923.15 रुपयांवर स्थिरावला. या पडझडीने समभागधारक कोट्यवधींनी पोळले; तसेच "इन्फोसिस'चेदेखील बाजार भांडवल 30 हजार कोटींनी कमी झाले. शेअरमधील घसरणीची "इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगलीच किंमत मोजावी लागली. मूर्ती कुटंबीयांकडे "इन्फोसिस'चे 3.44 टक्के शेअर्स आहेत. शेअरमधील घसरणीने मूर्ती कुटुंबीयांचे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com