भारतीय व्यवसायांतील संघर्ष कमी करण्याची गरज : मूर्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

अनेक बॅंका, सहकारी वित्तसंस्था नवउद्योजकांसाठी आपली दारे खुली ठेवतात. आजचे उद्योजक पूर्वीपेक्षा खूप चतूर आहेत. जागतिक पटलावर स्पर्धेचे वातावरण असल्यामुळे ते साहजिकच आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायला जाता, त्याच्या आधीच कुणीतरी ती केलेली असते.

चार्लोटेस व्हिले : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी येथील स्थानिक व्यवसायांमधील संघर्ष कमी करून सरकारने उद्योजकांसोबत विश्‍वासपूर्ण वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक व माजी अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी केले. याचसोबत जास्तीत जास्त तरुण उद्योगविश्‍वात आल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही, असे मूर्ती यांनी या वेळी सांगितले.

युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया येथील डार्डन स्कूल ऑफ बिझनेस येथे थॉमस जेफरसन फाउंडेशनने मूर्ती यांना पुरस्कार देऊन गौरविले. या वेळी ते बोलत होते. व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याचे धाडस भारतीय तरुणांनी करायला हवे. जगभरातील तरुणांनी असे केल्यास जागतिक अर्थव्यवस्था वेगळ्या वळणावर जाऊन तिचा विकास होईल. त्यामुळे जागतिक स्पर्धा होईल; पण ती सौहार्दपूर्ण असेल. भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी एकत्रित विचार करण्याची गरज असल्याचेही मूर्ती म्हणाले.

सध्याच्या युगात उद्योजकांपुढील आव्हाने तुलनेने कमी असून, आम्ही जेव्हा इन्फोसिस सुरू केली होती, त्या वेळी अशी परिस्थिती नव्हती, असे सांगत त्या काळात भांडवली साधने मिळवणे खूप जिकिरीचे असायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. अनेक बॅंका, सहकारी वित्तसंस्था नवउद्योजकांसाठी आपली दारे खुली ठेवतात. आजचे उद्योजक पूर्वीपेक्षा खूप चतूर आहेत. जागतिक पटलावर स्पर्धेचे वातावरण असल्यामुळे ते साहजिकच आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायला जाता, त्याच्या आधीच कुणीतरी ती केलेली असते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सजग राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योजकांनी चपळ, चतूर, जागतिक आणि स्पर्धात्मक राहायला हवे, असे सांगत मूर्ती यांनी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरूमंत्र दिला.

भारतीय विद्यार्थ्यांनी देशांतर्गत शिक्षण संस्थांमध्ये चांगला ठसा उमटविला असल्याचेही मूर्ती यांनी या वेळी नमूद केले. कोणताही भारतीय जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेला तरी त्याने जेथे राहतो त्याला दु:ख अगर त्रास दिला आहे, असे अद्याप कधीही घडलेले नाही. हे भारतीय समाजाने या पिढीला दिलेले वरदान आहे आणि या महत्त्वाच्या बाबी घेऊन प्रत्येक पिढीने पुढे जायला हवे.

 

Web Title: Need to reduce 'friction' in businesses in India: Narayana Murthy