अवघ्या एक दिवसात मिळणार पॅन क्रमांक

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका दिवसात परमनंट खाते क्रमांक (पॅन) आणि कर कपात खाते क्रमांक (टॅन) उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी कामकाज मंत्रालयासोबत करार केला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.

नवी दिल्ली - देशात व्यवसायपूरक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सरकारकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत आता अवघ्या एका दिवसात पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका दिवसात परमनंट खाते क्रमांक (पॅन) आणि कर कपात खाते क्रमांक (टॅन) उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी कामकाज मंत्रालयासोबत करार केला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.

याचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कंपन्या कंपनी कामकाज मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन एसपीआयसीई (आयएनसी 32) हा संयुक्त अर्जाचा फॉर्म भरतील. त्यानंतर मंत्रालयाकडून केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाकडे कंपनीच्या स्थापनेविषयी सर्व माहिती पोहोचली की अर्जदाराला सहजपणे पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध होईल, असे या निवेदनात म्हटले आहे. 

गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 19,704 नव्या कंपन्यांना अशा पद्धतीने पॅन क्रमांक देण्यात आला. त्यापैकी, मार्च महिन्यात 10,894 कंपन्यांनी पॅनसाठी अर्ज केला. त्यापैकी 95.63 टक्के प्रकरणांमध्ये कंपन्यांना चार तासांच्या आत पॅन क्रमांक मिळाला तर 94.7 टक्के प्रकरणांमध्ये टॅन क्रमांक उपलब्ध झाला. याशिवाय, सर्व कंपन्या आणि व्यक्तींना पॅन कार्डसोबत इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील पॅन कार्ड पाठविले जातेही, असेही प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितले आहे.