'एनआरआय' नागरिक जूनपर्यंत बदलू शकणार नोटा

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांसाठी जुन्या नोटा बदलून देण्याची मुदत 31 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, याच काळात परदेशात असलेल्या एनआरआय नागरिकांसाठी नोटा बदलून घेण्याची मुदत जून 2017पर्यंत असणार आहे.

मुंबई - अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नोटा बदलण्यासाठी मुदतीत वाढ केली असून, आता जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा जून 2017 पर्यंत बदलता येणार आहेत.

देशातील नागरिकांसाठी जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत 30 डिसेंबरला संपली आहे. आता आरबीआयने एनआरआय नागरिकांसाठी जुन्या नोटा बदलून घेण्याची मुदत वाढविली आहे. मात्र, ही सोय नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिकांसाठी उपलब्ध असणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केल्यानंतर आरबीआयने हा नवा निर्णय प्रसिद्ध केला.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांसाठी जुन्या नोटा बदलून देण्याची मुदत 31 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, याच काळात परदेशात असलेल्या एनआरआय नागरिकांसाठी नोटा बदलून घेण्याची मुदत जून 2017पर्यंत असणार आहे. भारतीय नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी कोणतीही मर्यादा असणार नाही. तर, एनआरआय नागरिकांसाठी फेमा अंतर्गत नोटा बदलून मिळतील. 2 जानेवारीपासून ही नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.