उर्जित पटेलांना धमकी देणार्‍यास अटक

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

उर्जित पटेलांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा द्यावा आणि तसे न केल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना जीवे मारू अशी धमकी तरुणाकडून देण्यात आली होती.

मुंबई - रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर उर्जित पटेल यांना ईमेलद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूरमधील एका 34 वर्षीय तरुणाने ही धमकी दिल्याचे समोर आले असून, याप्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने नागपूरमधून धमकी देणार्‍या वैभव बद्दलवार या तरुणास अटक केली आहे.

उर्जित पटेलांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा द्यावा आणि तसे न केल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना जीवे मारू अशी धमकी तरुणाकडून देण्यात आली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पटेलांना 23 फेब्रुवारीला त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर तरुणाकडून मेल आला होता.

यानंतर आरबीआयचे व्यवस्थापक वैभव चतुर्वैदी यांनी मुंबई पोलिसांकडे तशी तक्रार दाखल केली. आणि त्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्यामुळे हा तपास मुंबईच्या सायबर शाखेकडे सोपवण्यात आला होता. मुंबई सायबर शाखेने तज्ज्ञांच्या मदतीने मेल करणाऱ्या वैभव बद्दलवार या तरुणाला नागपूरमधील नंदवनमधून अटक करण्यात आली.

टॅग्स