रिझर्व्ह बँकेचा स्वतंत्र अंमलबजावणी विभाग

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

सध्या रिझर्व्ह बँकेचे नियामक आणि पाहणी हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगळे आहेत. नव्या विभागामुळे ही दोन्ही कामे एकत्रितपणे होतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नियमांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व्ह बँक पुढील आर्थिक वर्षापासून स्वतंत्र अंमलबजावणी विभाग स्थापन करणार आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की नियमांची अंमलबजावणी आणि त्यांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी विभाग स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. हा विभाग 1 एप्रिलपासून कार्यरत होईल. या विभागाकडे नियम, पाहणी आणि अंमलबजावणी या तीन महत्त्वाच्या बाबींची जबाबदारी असेल. वित्तीय संस्था नियमांप्रमाणे कार्य करतात की नाही आणि त्यांची पारदर्शकता तपासण्यासोबत ग्राहकहिताचे संरक्षण करण्याचे काम हा विभाग करेल.

नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हा विभाग लक्ष ठेवणार आहे. नियमांची अंमलबजावणी होत नसल्यास हा विभाग योग्य ती कारवाई करणार आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे नियामक आणि पाहणी हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगळे आहेत. नव्या विभागामुळे ही दोन्ही कामे एकत्रितपणे होतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.