रिलायन्सची तेल शुद्धीकरणातून घसघशीत कमाई 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सचा सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला प्रतिबॅरल कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून 11.5 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली.

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत 8 हजार 46 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली. सोमवारी (ता.24) रिलायन्सने 2016-17 या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले. 

गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सचा सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला प्रतिबॅरल कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून 11.5 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली. चौथ्या तिमाहीत कंपनीला 8 हजार 46 कोटींचा नफा झाला आणि 74 हजार 600 कोटींचा महसूल मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 12.3 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला प्रतिबॅरल 10.8 डॉलरचे मार्जिन मिळाले होते, तर 7 हजार 167 कोटींचा नफा झाला होता. वार्षिक आधारावर रिलायन्सला 29 हजार 901 कोटींचा नफा झाला असून, यात 18.8 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली आहे. कंपनीचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. पेट्रोकेमिकल्सप्रमाणेच रिलायन्स रिटेलच्या महसुलात 60 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातील मार्जिनमध्ये सलग नवव्या तिमाहीत वाढ झाली असून, जागतिक बाजारातील प्रतिकूल वातावरणात केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. 

'जिओ'ला तोटा 
तब्बल सहा महिने मोफत दूरसंपर्क सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीत जिओला तब्बल 22.50 कोटींचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तोट्यात तीनपटीने वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत जिओला 7.5 कोटींचा तोटा झाला होता. जिओने सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सेवा सुरू केली. ऑक्‍टोबर 2016 ते मार्च 2017 दरम्यान कंपनीला काहीच कार्यान्वयन उत्पन्न मिळाले नसून, इतर उत्पन्न 2.23 कोटी रुपयांवरुन 50 लाखांपर्यंत खाली आले आहे. इतर उत्पन्नात 77.8 टक्‍क्‍यांची घसरण नोंदवण्यात आली. 31 मार्चनंतर मोफत सेवा बंद करून ग्राहकांना प्राइम सदस्यत्व देऊ केले. त्याअंतर्गत सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. जिओचे 10 कोटींहून अधिक ग्राहक आहे.