करचुकवेगिरी 1.37 लाख कोटींची

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

तीन आर्थिक वर्षातील स्थिती; महसूल विभागाकडून कारवाई

नवी दिल्ली: मागील तीन आर्थिक वर्षात प्रत्यक्ष व प्रत्यक्ष करांमध्ये 1.37 लाख कोटी रुपयांची कर चुकवेगिरी शोधण्यात आणण्यात आली असून, 13 हजार 300 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार करणाऱ्या 1 हजारपेक्षा अधिक बनावट कंपन्या उघडकीस आणण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल विभागाने दिली.

विभागाने म्हटले आहे, की देशभरात 23 हजार 64 ठिकाणी महसूल विभागाने छापे टाकले. यात प्राप्तिकर विभागाने 17 हजार 525 आणि अन्य तपास यंत्रणांनी उरलेले छापे टाकले. यातून मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये झालेली 1.37 लाख कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आली आहे. यामध्ये प्राप्तिकर 69 हजार 434 कोटी, सीमा शुल्क 11 हजार 405 कोटी, केंद्रीय उत्पादनशुल्क 13 हजार 952 कोटी आणि सेवा कर 42 हजार 727 कोटी रुपये आहे. या प्रकरणी 2 हजार 814 खटले दाखल करण्यात आले असून, यातील 1 हजार 966 खटले प्राप्तिकराशी निगडित आहेत. या प्रकरणी 3 हजार 893 जणांना अटक करण्यात आली आहे.

बनावट कंपन्यांवर मागील तीन आर्थिक वर्षांत केलेल्या कारवाईत 1 हजार 155 बनावट कंपन्या उघडकीस आल्या आहेत. या कंपन्यामार्फत 22 हजार जणांचे 13 हजार 300 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार उघडकीस आले. कंपनी व्यवहार मंत्रालयाने बंद आणि कार्यरत नसलेल्या कंपन्यांना सुमारे 1 लाखपेक्षा अधिक नोटिसा बजावल्या आहेत.

बेनामी मालमत्तेवरही टाच
बेनामी मालमत्ता कायदा नोव्हेंबर 2016 मध्ये लागू झाला आहे. आतापर्यंत 245 बेनामी व्यवहार शोधण्यात आले आहेत. यामध्ये 124 प्रकरणांमध्ये 55 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाने दिली.