‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा शेअर आठ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात सुमारे साडेसात टक्के वाढीसह तब्बल आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. जून 2009 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या शेअरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत, रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा काल (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी यांनी भविष्यात जिओ नेटवर्कसहित किफायतशीर दरात जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण माहिती (डेटा) उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले.

जियोच्या या निर्णयामुळे कंपनीतील पैशाचा ओघ वाढीस लागेल. ही बाब रिलायन्स समुहाच्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारी ठरली आहे. याशिवाय, जियोच्या मोफत सेवा बंद झाल्याने प्रतिस्पर्ध्यांचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज(बुधवार) 1092.05 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 1092.05 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 1170.50 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजता) कंपनीचा शेअर 1166.10 रुपयांवर व्यवहार करत असून 7.15 टक्क्यांनी वधारला आहे.