सेन्सेक्‍स सुसाट... 

सेन्सेक्‍स सुसाट... 

मुंबई - कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने शेअर बाजारात तेजीचा वारू चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 35 हजार 548 अंश या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही आज 11 हजार अंशांची पातळी ओलांडली. 

पाच सत्रांत 973 अंशांची वाढ 
सेन्सेक्‍समध्ये आज 282 अंशांची वाढ होऊन तो 36 हजार 548 अंशांवर बंद झाला. याआधी 29 जानेवारीला सेन्सेक्‍स 36 हजार 283 या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. मागील सलग पाच सत्रांत निर्देशांकात 973 अंशांची वाढ झाली आहे. 

निफ्टीची घोडदौड 
निफ्टीमध्ये आज 74 अंशांची वाढ होऊन तो 11 हजार 23 अंशांवर बंद झाला. याआधी 31 जानेवारीला निर्देशांक 11 हजार 27 अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. 

रिलायन्स पुन्हा 100 अब्ज डॉलरवर 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात आज 4.42 टक्‍क्‍यांची वाढ झाली. या वाढीने रिलायन्सने पुन्हा एकदा 100 अब्ज डॉलरचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला आहे. आयसीआयसीआय बॅंक, विप्रो, एल अँड टी, एचडीएफसी, इंड्‌सइंड बॅंक, येस बॅंक, एसबीआय, एचयूएल आदी कंपन्यांचे समभागही आज तेजीसह बंद झाले. 

तेल कंपन्यांना फायदा 
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या भावात घसरण झाली. यामुळे तेल वितरक कंपन्या आणि विमान कंपन्यांच्या समभागांना मागणी दिसून आली. दिवसअखेर भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल या कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. इंटरग्लोब एव्हिएशन, जेट एअरवेज यांसारख्या विमान कंपन्यांच्या समभागामध्ये वाढ झाली. वेदांता, इन्फोसिस, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट आदी कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. 

किरकोळ गुंतवणूकदारांचा जोर 
देशात मॉन्सूनची कामगिरी समाधानकारक सुरू असून, कृषी क्षेत्राला फायदा मिळणार आहे. बहुतांश बड्या कॉर्पोरेट्‌सची पहिल्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारी सकारात्मक असण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले आहे. 

तेजीच्या लाटेची कारणे 
- जागतिक बाजारात खनिज तेलाचे उतरते भाव 
- चलन बाजारात रुपयाला बळकटी 
- मॉन्सूनच्या प्रगतीने कृषीला फायदा 
- अमेरिका आणि चीनमध्ये चर्चा होण्याची शक्‍यता 
- कंपन्यांची सकारात्मक आर्थिक कामगिरी 
- ऊर्जा, वित्तीय कंपन्यांच्या समभागात तेजी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com