बॅंकांना सेवाकराच्या नोटिसा 

bank
bank

नवी दिल्ली - खात्यावर किमान शिल्लक ठेवणाऱ्या खातेदारांना मोफत सेवा देणाऱ्या बॅंकांना वस्तू व सेवा (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाने सेवाकर भरण्यासाठी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, ॲक्‍सिस बॅंक आणि कोटक महिंद्र बॅंक या सार्वजनिकसह खासगी क्षेत्रातील बॅंकांचा समावेश असून, त्यांना हजारो कोटी रुपयांचा सेवाकर पूर्वलक्षी प्रभावाने भरण्याची सूचना करण्यात आली आहे. 

आगामी काळात इतरही बॅंकांना अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या जाण्याची शक्‍यता आहे. मागील पाच वर्षांतील सेवा कराची मागणी बॅंकांकडून करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बॅंका खातेधारकाला खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास शुल्क आकारतात. याचाच अर्थ बॅंका सर्व सेवांसाठी खात्यावर किमान  शिल्लक ठेवून घेतात. ही किमान शिल्लक म्हणजे सेवांसाठी घेतलेले शुल्क असल्याने त्यावर सेवा कर आकारण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कायदेशीर आव्हान देण्याचा विचार 
पूर्वलक्ष्यी प्रभावाने हा कर ग्राहकांकडून कसा वसूल करावयाचा याची चिंता आता बॅंकांना भेडसावत आहे. यामुळे हा सेवाकर बॅंकांना भरावा लागल्यास त्याचा बोजा ग्राहकांवर येणार आहे. बॅंका या नोटिशीला कायदेशीर आव्हान देण्याचा विचार करीत आहे. याचबरोबर सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करण्यावरही त्यांचा विचारविनिमय सुरू आहे. 

पाच वर्षांपासून वसुली?  
बॅंकांकडून या सेवाकराची वसुली प्रत्यक्षात झाल्यास ती मागील पाच वर्षांपासून करण्यात येईल. हा सेवाकराचा आकडा सहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तो आणखी वाढण्याची शक्‍यता बॅंकांना वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com