मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या संधी : चौहान

पीटीआय
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

लंडन : ब्रिटनमधील गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक मध्य प्रदेश राज्य आणि ब्रिटनला फायदेशीर ठरेल, अशा प्रकारच्या गुंतवणुकीची संधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.

चौहान यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात ब्रिटनमधील वेगवेगळ्या क्षेत्रांतील गुंतवणूकदारांची भेट घेऊन त्यांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि ब्रिटन-भारत व्यवसाय परिषद (युकेबीआयसी) यांच्या वतीने आयोजित परिसंवादात बोलताना चौहान म्हणाले, ""मध्य प्रदेश हे गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र आहे. येथे केलेल्या गुंतवणुकीचा फायदा राज्याला; तसेच ब्रिटनला होईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनिवासी भारतीय उद्योगपती नॅट पुरी यांनी राज्यात व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य केंद्र उभारण्यात रस दाखविला आहे.''

"ब्रिटनमधील औषधे आणि आरोग्यसुविधा कंपन्यांचे शिष्टमंडळ ऑक्‍टोबरमध्ये मध्य प्रदेशला भेट देत आहे. आरोग्यसुविधेसाठी भारत आणि ब्रिटनची संस्था राज्यात स्थापन करण्याचा मानस आहे. मध्य प्रदेश हे देशाचे हृदय आहे. एकेकाळी मागास गणले जाणारे राज्य आता अभूतपूर्व विकासाच्या आधारावर गेली आठ वर्षे दोन आकडी विकासदर नोंदवीत आहे,'' असे चौहान यांनी सांगितले.